‘रोहित, ऑक्सिजनचा टँकर पाठवला आहे. तू स्वतः थांबून तो उतरुन घे’

rohit patil

सांगली : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशातच, रुग्णालयात बेड्स, ऑक्सिजन, रेमडेसीवीर, अपुरी आरोग्य यंत्रणा, डॉक्टरांची कमतरता व इतर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मनस्ताप सहन करावा लागला असून व्यवस्थेविरोधात नागरिकांमध्ये चीड निर्माण होत आहे.

सांगली जिल्ह्यात देखील काही तास पुरेल इतकाच ऑक्सिजन शिल्लक होता आणि प्रशासन ऑक्सिजन टँकर मिळवण्यासाठी धावाधाव करीत होते. अशातच रात्री साडेबारा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिवंगत आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना फोन केला. ‘रोहित, ऑक्सिजन टँकर पाठवला आहे. तू स्वतः थांबून तो उतरुन घे’. अजित पवारांच्या फोननंतर क्षणाचाही विलंब न करता रोहित पाटील यांनी मध्यरात्री सांगलीत जाऊन ऑक्सिजन टँकर उतरुन घेतला. त्यांनतर यातील २३ जम्बो टाक्या आणि २ डुरा टाक्या ऑक्सिजन घेऊन रोहित पाटील स्वतः ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा उपस्थित झाले. ऑक्सिजनभावी कोरोना रुग्ण दगावू नयेत, याची काळजी घेत मध्यरात्री रुग्ण वाचवण्यासाठी आबांच्या मुलाने केलेल्या धडपडीचे कौतुक होत आहे.

कोरोना रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने तासगावच्या आमदार सुमन पाटील व आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या प्रयत्नातून इथल्या ग्रामीण रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी 56 ऑक्सिजनेटेड बेड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यामुळे याठिकाणी सध्या अनेक रुग्णांवर उपचार सुरु आहेत. मात्र एकूणच राज्यभरात रुग्णसंख्या वाढ वेगाने होत असल्याने ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासत आहे. तासगावातही कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडत आहे. या स्थितीनंतर तासगावातील रुग्णांसाठी ऑक्सिजन टँकर उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी रोहित पाटील यांनी राज्य सरकारकडे केली होती. या मागणीचा ते सतत पाठपुरावा करत होते. तासगावातील गंभीर स्थिती ते सरकारच्या निदर्शनास आणून देत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे त्यांनी ऑक्सिजन टँकरची मागणी लावून धरली होती.

महत्वाच्या बातम्या