आर्थिक गैरव्यवहार प्रकरण : रॉबर्ट वढेरा ईडीसमोर हजर

नवी दिल्ली – भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले गांधी कुटुंबियांचे जावई रॉबर्ट वढेरा आज सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) चौकशीला सामोरे जात आहेत. रॉबर्ट वढेरा बुधवारी दुपारी चौकशीसाठी ‘ईडी’च्या कार्यालयात हजर झाले असून ईडीचे अधिकारी कसून चौकशी करत आहेत .पती रोबर्टयांच्यासोबत पत्नी प्रियंका यादेखील हजर होत्या. रॉबर्ट चौकशीसाठी आतमध्ये गेल्यानंतर प्रियंका काही वेळाने येथून निघूनही गेल्या.

लंडनमध्ये वढेरा यांची १.९ लक्ष पौंडांची मालमत्ता असल्याचा संशय आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘ईडी’कडून वढेरांची चौकशी होणार आहे. वढेरांच्या अडचणी प्रचंड वाढू लागल्या असून आता राजकारण देखील तापू लागले आहे.

दरम्यान, भाजपचे प्रवक्ते सांबित पात्रा यांनी वढेरांना लक्ष्य केले. वढेरा यांनी अनेक कंपन्यांकडून आडमार्गाने पैसा मिळवला. त्यांच्यासारखा ‘रोडपती’ ‘करोडपती’ कसा काय झाला, असा सवाल पात्रा यांनी विचारला. ते बुधवारी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.