माढ्यात न्यायाधीशांचे घर फोडून चांदीचे दागिने लंपास

mother,son,attack,sangali

सोलापूर- न्यायालयातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीकांत काशीराम देवकर यांचे भाड्याचे घर फाेडून चाेरट्यांनी १९ हजार २०० रुपयांचे चांदीचे दागिने लंपास केले. रात्री एकच्या सुमारास येथील सन्मतीनगरात हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक चाकू, लोखंडी कटावणी, लहान करवत जप्त केले आहे. तर दोघे पळून गेले. प्रमोद जब्बर शिंदे (वय १८, रा. पाण्याच्या टाकीजवळ, माढा) असे संशयिताचे नाव आहे.

प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीकांत देवकर हे सन्मतीनगरात भाड्याच्या घरात राहण्यास आहेत. आठ दिवसांपूर्वी न्यायाधीश देवकर हे प्रशिक्षणासाठी गेले आहेत. ते घरी नसल्याने त्यांच्या पत्नी माहेरी वडूज (जि. सातारा) येथे गेल्या होत्या. घरात कोणीही नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी घराच्या गेटचा आणि दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यातील चांदीचे दागिने लंपास केले. तसेच कपाटातील साहित्य घरात अस्ताव्यस्त फेकून दिले.

दरम्यान, न्यायाधीश देवकर यांनी प्रशिक्षणाला जाताना न्यायालयातील शिपाई प्रकाश गुरुलिंग पाटील (रा. सोलापूर) याला घराकडे लक्ष देण्यास सांगितले होते. त्यानुसार प्रकाश हा ड्युटी संपल्यावर रात्री एकच्या सुमारास न्यायाधीश शिंदे यांच्या सन्मतीनगरातील घराकडे गेला. त्यावेळी न्यायाधीश देवकर यांच्या घराचे गेट उघडे आणि दरवाजाचा कडीकोयंडा तुटल्याचे दिसले. तो पोलिसांना कळवण्यासाठी पोलीस ठाण्याकडे जाताना वाटेतच पोलिसांची गाडी दिसली. प्रकाश हा पोलिसांना घेऊन देवकर यांच्या घराकडे आला तेव्हा घराच्या परिसरातून अनोळखी तिघे पळताना आढळले. पोलिसांनी पाठलाग करून संशयित प्रमोद याला पकडले तर दोघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. न्यायाधीश देवकर यांच्या पत्नी सायंकाळी येथे आल्यानंतर चोरीची नेमकी आकडेवारी कळाली. न्यायाधीश देवकर यांच्या पत्नी यू. एस. देवकर यांनी फिर्याद दिली. सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले तपास करत आहेत.

Loading...