fbpx

‘नीरा-देवधरच्या पाण्यावरून पवारांचा उगाचं कांगावा, ते पाणी चोरतचं होते’

mp ranjeetsinh naik nimbalkar

टीम महाराष्ट्र देशा : ऐन दुष्काळात नीरा देवधर पाण्याचे राजकारण पेटले असून राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार आणि माढा खा.रणजितसिंह निंबाळकर यांच्यात चांगलेच शाब्दिक चकमक होताना दिसत आहे. बरामतीने आजवर बेकायदेशीर रित्या पाणी चोरले. मात्र तेच पाणी आम्ही रोखले. त्यामुळे यात कसले राजकारण आले, असा सवाल विचारत माढा खा.रणजितसिंह निंबाळकर यांनी शरद पवारांना लक्ष केले. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी रणजितसिंह निंबाळकर म्हणाले की, दुष्काळी भागासाठी निर्माण केलेल्या धरणांमधील पाणी आजपर्यंत शरद पवार यांनी करारनामे बदलून बारामतीला पळवले. करारनामे संपले तरी पाण्याची लुट सुरूच ठेवली. मात्र आता राज्य शासनाने हे पाणी बंद केले आहे. त्यामुळे त्याचा फायदा आता पंढरपूर , माळशिरस , फलटण या दुष्काळी तालुक्यांना होणार आहे.

तसेच नीरा देवधर धरणातील पाण्यावर दुष्काळी जनेताचा हक्क आहे. मात्र हे पाणी बारामतीकरांनी पळवले. एरवी हेच सगळे दुष्काळावर भाष्य करत असतात आणि पाठी मागे ही कृती करत असतात. त्यामुळे हे हक्काचे पाणी तुम्ही चोरून नेत असताना आम्ही रोखले यात कसले राजकारण आले, असा सवाल खा.निंबाळकर यांनी पवारांना विचारला. ते पुढे म्हणाले की, हे हक्काचे पाणी दुष्काळी जनतेला मिळवून देण्यासाठी आता कालव्यांची कामे वेळीच हाती घेणार आहोत.

दरम्यान बारामतीला येणारे नीरा डाव्या कालव्याच्या पाणी बंद करण्यावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हल्लाबोल केला. ‘राजकारण करावं पण ते कुठे आणि कधी करावं हे कळायला पाहिजे’. अशा शब्दात त्यांनी वरील प्रकरणाचा समाचार घेतला. पाण्यावरून राजकारण करू नये, पाण्यामुळे जिल्ह्याजिल्ह्यात वाद निर्माण होऊ नये, अशी प्रतिक्रिया दिली होती.

नेमकं काय आहे प्रकरण ?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 2009 ला करार बदलत बारामतीला 60 टक्के पाणी दिलं होतं. 2017 मध्ये हा करार संपुष्टात आला होता. मात्र करार संपल्यानंतरही हे पाणी सुरूच होतं. अखेर नाईक निंबाळकरांनी पाठपुरावा करून हे पाणी बंद करण्यात यश मिळवलंय. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशाने बारामतीला जाणारे निरा डाव्या कालव्याचं नियमबाह्य पाणी बंद करण्यात येणार आहे. महाजनांनी याबाबत आदेश दिले असून दोन दिवसांत लेखी आदेश निघणार आहे.

जलसंपदा मंत्री महाजन यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा करुन डाव्या कालव्यातून बारामतीला नियमबाह्य जाणारे पाणी कायमचे बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. याबाबतचा आदेश येत्या दोन दिवसात काढावा असेही त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. हा अध्यादेश निघाल्यास सातारा जिल्ह्यातील वीर, भाटघर, नीरा-देवघर या धरणातून बारामती व इंदापूर तालुक्याला जाणारे पाणी कायम स्वरुपी बंद होवून त्याचा फायदा फलटण, माळशिरस, सांगोला व पंढरपूर या तालुक्यांना १०० टक्के होणार आहे.दरम्यान, रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी खेळलेल्या चाणाक्ष खेळीने पवारांना मात्र चांगलाच धक्का बसलाय.