वाढत्या महागाईत दिलासा, तांदळाचे दर उतरले

rice

औरंगाबाद : जगातील प्रमुख तांदूळ उत्पादक देशांमध्ये यंदा तांदळाचे उत्पादन कमी झाले होते. त्यामुळे नाईलाजाने चीनने भारताकडून तांदूळ खरेदी करावा लागला. पण मागील काही दिवसांत चीनने आयात कमी केली आहे. त्याचा परिणाम आता भारतीय बाजारपेठेत जाणवू लागला आहे. गेल्या तीन दिवसांत स्थानिक बाजारात तांदळाचे भाव क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांनी उतरलेत. औरंगाबाद शहरात दररोज ३५ ते ४० टन तांदळाची विक्री होते. त्यामुळे ग्राहकांना वाढत्या महागाईत काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

नवीन तांदळाची आवक दिवाळीनंतर सुरू होते. सुरुवातीला आवक वाढल्याने भाव कमी होतात. पण यावर्षी जेवणातील अविभाज्य घटक असलेला तांदूळ यंदा महागला होता. चीनने आयात घटवल्याने मागील आठवड्यात तांदळाचे भाव २०० ते ३०० रुपयांनी कमी झाले. आजमितीला तांदूळ ३००० ते ५३०० रुपये, तर बासमती तांदूळ ३२०० ते ७८०० रुपये प्रतिक्विंटल विकला जात आहे. गत वर्षीच्या तुलनेत बिगर बासमती तांदूळ क्विंटलमागे ४०० ते ८०० रुपयांपर्यंत तर बासमती तांदूळ क्विंटलमागे ३०० ते १ हजार रुपयांपर्यंत जास्त भावात विकत होता.

भारत प्रामुख्याने बांगलादेश, नेपाळ, बेलीन आणि सेनेगलमध्ये बिगर बासमती तांदळाची निर्यात करतो. तर इराण, सौदी अरेबिया आणि इराक, इत्यादी देशांना बासमती तांदूळ निर्यात करतो. थायलंड हा प्रमुख तांदूळ उत्पादक देश मानला जातो. पण तिथे दुष्काळामुळे तांदळाचे उत्पादन कमी झाले होते. तसेच व्हिएतनाममध्ये उत्पादन घटले. यामुळे चीनने भारताकडून तांदूळ खरेदी केल्याने देशात तांदळाचे भाव चांगलेच वधारले. यामुळे देशात २०१९ च्या आर्थिक वर्षात ९९ लाख टन तांदळाच्या निर्यातीच्या तुलनेत २०२० ते २०२१ या आर्थिक वर्षात १०४ कोटींपर्यंत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या