उद्धवा, अजब तुझे सरकार! मदत राहिली बाजुला, शेतकऱ्यांना पीक कर्जही मिळेना

जालना : अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. त्यातच नापिकीच्या संकटाला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे. आस्मानी संकटामुळे देशोधडीला लागलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून नुकसान भरपाईची अपेक्षा आहे. मात्र, मदत राहिली बाजुला, साधे शेतकऱ्यांना पीक कर्जही मिळत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

गेल्या चार महिन्यांपासून सतत चकरा मारूनही बँक व्यवस्थापक उडवाउडवीची उत्तरे देत पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत असल्याने हतबल शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला. ही घटना सोमवारी दुपारी परतूर तालुक्यातील वाटूर फोटो येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत घडली.

मुक्तिराम नानाभाऊ घाडगे असे शेतकऱ्याचे नाव आहे.मुक्तिराम घाडगे यांची वाई शिवारात शेतजमीन आहे. मागील चार महिन्यांपासून शेतीवर पीक कर्ज मिळावे यासाठी ते वाटूरच्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत चकरा मारत आहेत. मात्र बँक व्यवस्थापक त्यांना उडवाउडवीची उत्तर देत कर्ज देण्यास टाळाटाळ करत होते. यामुळे हतबल झालेल्या मुक्तिराम यांनी थेट बँकेतच अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मदत करता आली नाही तर किमान बँकेच्या अधिकाऱ्यांना तरी पीक कर्ज देण्याबाबत आदेशित करावे अशी मागणी होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या