‘फ्रीडम २५१’ या फोन कंपनीचा संचालक गजाआड

गाझियाबाद: ‘फ्रीडम २५१’ हा फोन लाँच करून अख्या देशभरात खळबळ उडवणा-या कंपनीच्या संचालकाला अटक करण्यात आली आहे. हा फोन लाँच करणारी कंपनी ‘रिंगिंग बेल्स’चे व्यवस्थापकीय संचालक मोहित गोयल यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ग्राहक आणि वितरकांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आलेली आहे.

गाझियाबादची फर्म आयाम इंटरप्रायजेसनं गोयल यांच्याविरुद्ध १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीत म्हटलं आहे की, गोयल व कंपनीच्या अन्य कर्मचार्‍यांनी आयाम इंटरप्रायजेसला ‘फ्रीडम २५१’ चे वितरक होण्यास तयार केले. फर्मने रिंगिंग बेल्सच्या नावाने ३0 लाख रुपयांचे आरटीजीएस केले. कंपनीने १३ लाख रुपयांचे फोन दिले. अनेकदा पाठपुरावा केल्यानंतर एक लाख रुपये परत केले. उर्वरित १६ लाख रुपये मागितल्यावर फर्मच्या मालकास व कर्मचार्‍यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

फ्रिडम २५१ या फोनची ३0 हजार जणांनी फोनची बुकिंग केली होती आणि ७ कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी त्याची नोंदणी केली, असा दावा फर्मने केला आहे. फ्रीडम जगातील सर्वात स्वस्त फोन असल्याचे सांगत जाहिरात कंपनीने केली होती. मात्र जागोजागी या कंपनीनं ग्राहकांची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.