निसर्गावर जीवापाड प्रेम करणारे रिक्षा चालक प्रकाश माने झाले वृक्ष लागवडीचे प्रेरणादूत…

मुंबई : दुष्काळ हटवायचा असेल ना, तर प्रत्येकानं दोन रोपं लावून ती जगवली पाहिजेत असा आग्रह धरणारे दहिसरचे रिक्षाचालक प्रकाश सुरेश माने यांनी आपली रिक्षा अगदी अनोख्या पद्धतीने सजवली आहे. त्यांनी आपल्या रिक्षाला जिथे शक्य आहे तिथे रोपं लावून ती हिरवाईने नटवली आहे.

आपल्या या आगळ्यावेगळ्या रिक्षाबद्दल सांगताना श्री. माने म्हणाले, वेगवेगळ्या रोपांनी सजवलेली माझी रिक्षा जेव्हा रस्त्यावरून धावते तेव्हा ती लोकांना खूपच आवडते. रिक्षात बसणारे लोक म्हणतात, आम्हाला रिक्षात नाही तर उद्यानात बसल्यासारखं वाटतं. मनाला खूप प्रसन्नता आणि आनंद मिळतो. लोकांच्या या प्रतिक्रिया मला खूप प्रोत्साहित करतात.

आपल्या सगळ्यांनाच झाडांची आणि निसर्गाची खूप ओढ असते. दररोजच्या धकाधकीच्या प्रवासात लोक माझ्या रिक्षात कधी पंधरा मिनिटे, कधी अर्धा तास तर कधी एक तास बसतात.. मग मी त्यांना कुठल्या प्रकारे आनंद देऊ शकतो याचा मी विचार केला आणि मग प्लास्टिकचे फुलं, रंगीबेरंगी पताका लावण्यापेक्षा ती अधिक सजीवपणे उठून दिसण्यासाठी माझ्या रिक्षाला वेगवेगळ्या ठिकाणी मध्यम आणि लहान ऊंचीची १० रोपं बांधून घेतली. यात पांढरं तगर आहे, जास्वंद आहे, तुळस आहे, मनी प्लांट आहे, कडिपत्त्याचं रोपं आहे आणि इतर ही रोपं आहेत.

माझ्या घरात आईसह माझी पत्नी आणि तीन मुलं आहेत श्री. माने सांगत होते, त्यांना सगळ्यांना झाडं लावण्याची खूप आवड आहे. आम्ही केतकीपाडा, दहिसर येथील आदिवासी पाड्यात राहातो. निसर्गाच्या सान्निध्यात राहात असल्याने झाडांची आवड होतीच.. त्यातून ही कल्पना सूचली.

सुधीर मुनगंटीवार यांनीही केले कौतुक

पोटापाण्यासाठी लोक विविध प्रकारचे उद्योग-व्यवसाय करतात. पण हे करत असताना सामाजिक भान जपून पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे येणारे, हरित महाराष्ट्रासाठी योगदान देणारे रिक्षाचालक प्रकाश माने यांच्यासारखे योद्धे हे खऱ्या अर्थाने पर्यावरण रक्षणाचे, वृक्ष लागवडीच्या मोहिमेचे प्रेरणादूत ठरतात अशी प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

वन विभागाने तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प केला असून आतापर्यंत १७ कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पापोटी राज्यात २१ कोटीहून अधिक लागवड झाली आहे. तर येत्या पावसाळ्यात आपल्या सर्वांना मिळून ३३ कोटी वृक्ष लागवड करावयाची आहे. राज्य दुष्काळाने त्रस्त असताना अधिकाधिक वृक्ष लावून पडणाऱ्या प्रत्येक पाण्याचा थेंब जमिनीत मुरवण्यासाठी आणि भूजलपातळी वाढवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची पराकाष्ठा होणे गरजेचे आहे. प्रकाश माने यांच्यासारखी माणसं या मोहिमेचा आधार असून हरित महाराष्ट्राच्या निर्मितीचे ते खरे शिल्पकार आहेत असं मला वाटतं असंही मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.