मनसेच्या नेत्यांमधले अंतर्गत मतभेद चव्हाटयावर,संतापलेले देशपांडे बैठकीतून निघून गेले

mns pune

मुंबई – जवळ आलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. एकीकडे मनसेप्रमुख राज ठाकरे झांझावाती दौरे काढत आहेत, तर मनसैनिकही कमालीचे आक्रमक झाले आहेत. मात्र पक्षासाठी अशी सकारात्मक परिस्थिती असताना मनसेच्या नेत्यांमध्येच खटके उडत असल्याचे चित्र समोर आले आहे. आज मुंबईत पालिकेच्या एल विभागीय कार्यालयामध्ये आंदोलन करण्यासाठी गेलेले मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडे यांच्यात मतभेद झाले. त्यामुळे या आंदोलनातून संदीप देशपांडे आणि अन्य काही कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला.

नुकतेच तुरुंगातून सुटून आलेले मनसेचे नगरसेवक संजय तुर्डे यांनी त्यांच्या भागातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी एल वॉर्डमध्ये पालिका अधिका-यांसोबत बैठकीचे आयोजन केले होते.चर्चा सुरू असताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांची भूमिका न पटल्याने संदीप देशपांडे तडक बैठकीतून निघून गेले. हा सर्व प्रकार प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर घडला. नांदगावकर हे मनसेतील ज्येष्ठ नेते असून राज ठाकरे यांच्या जवळचे आहेत. तर देशपांडे त्यांच्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात. पण मनसेतील या दोन बड्या नेत्यांमध्येच खटके उडाल्याने मनसेच्या नेत्यांमधले अंतर्गत मतभेद चव्हाटयावर आले आहेत.