रिजीजू यांच्याविरुद्ध हक्कभंग ठराव आणणार ; शूर्पणखा व्हिडिओ रेणुका चौधरींना झोंबला

shurpnakha renuka chaudhari

नवी दिल्ली – गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी पंतप्रधानांची टिप्पणी व रामायणातील रावणाची बहीण शूर्पणखा हिचे विकट हास्य यांची सांगड घालून शेअर केलेला व्हिडिओ सोशल मीडियामध्ये चर्चेचा विषय ठरला होता. हा महिलावर्गाचा अपमान असल्याचे सांगताना चौधरी यांनी आपण मोदी व रिजीजू यांच्याविरुद्ध हक्कभंग ठराव आणणार असल्याचे सांगितले. राज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात कुत्सित हास्याद्वारे अडथळे आणणाऱ्या कॉंग्रेस नेत्या खासदार रेणुका चौधरी व त्यांना पंतप्रधानांनी रामायण मालिकेचा संदर्भ देऊन लगावलेली चपराक हे प्रकरण आज राजकीय अंगाने चिघळले आहे.

आपण पत्नी व दोन मुलींची आई आहोत, असे सांगताना चौधरी यांचा गळा भरून आला. मंत्री रिजीजू यांच्याविरुद्ध राज्यसभेत हक्कभंग येऊ घातला आहेच; पण त्यांना येथे बोलू देण्यासही यापुढे कॉंग्रेस कितपत मुभा देईल याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. त्याआधी राज्यसभेतील महिला खासदारांनी राज्यसभाध्यक्ष वेंकय्या नायडू यांची भेट घेऊन पंतप्रधानांच्या टिप्पणीवर जोरदार आक्षेप घेतला होता. आम्ही सर्वांनी मंत्री रिजीजू यांच्याविरुद्ध हक्कभंगाची नोटीस दिल्याचे कुमारी सेलजा यांनी सांगितले. पंतप्रधानांनी चौधरी व सभागृहाची माफी मागावी, अशीही मागणी त्यांनी केली.

काय आहे नेमकं प्रकरण ?
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाला राज्यसभेत काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं. त्यावेळी मोदींनी आधार कार्ड संकल्पनेचं श्रेय तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणींना दिलं. तेव्हा काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी जोरात हसू लागल्या. सभापती व्यंकय्या नायडू यांनी चौधरींच्या हास्यावर नाराजी व्यक्त केली. त्याचवेळी मोदींनी व्यंकय्या नायडूंना मध्येच थांबवलं. ‘रेणुकाजींना काहीही बोलू नका, अशी माझी सभापतींना विनंती आहे. ‘रामायण’ मालिकेनंतर बऱ्याच वर्षांनी असं हास्य ऐकण्याचं भाग्य लाभलं’ असा टोला मोदींनी लगावला.

मोदींच्या वक्तव्यानंतर भाजपसह मित्रपक्षातील सर्व सदस्य जोरजोरात हसायला लागले. ‘पंतप्रधानांनी वैयक्तिक टीका केली आहे. अर्थात तुम्ही त्याशिवाय काय अपेक्षा करु शकता. मला यावर प्रतिक्रिया देऊन खालच्या स्तराला जायचं नाही. कुठल्याही महिलेबाबत असं वक्तव्य करणं निंदनीय आहे’ असं चौधरी म्हणाल्या.यानंतर ‘मंत्री किरेन रिजीजू यांनी पोस्ट केलेला व्हिडिओ आक्षेपार्ह आहे ज्यात रेणुका चौधरी यांच्या हसण्याची तुलना शूर्पणखेच्या राक्षसी हास्याशी केली.