हल्दीरामच्या अन्न नमुन्यांची फेर तपासणी होणार- बापट

Retesting of Haldiram's food

नागपूर : नागपूर येथील हल्दीराम या मिठाई उत्पादक कंपनीमार्फत उत्पादित अन्न नमुने दोषयुक्त असतानाही ते दोषयुक्त नसल्याचे उत्तर देणाऱ्या अधिकाऱ्यांची सचिवांच्या मार्फत तसेच हल्दीराम उत्पादित अन्न नमुन्यांची पुन्हा देशातील नामवंत प्रयोगशाळेतून फेर तपासणी करण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी  विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीवर उत्तर देताना दिले.

नागपूर स्थित हल्दीराम या कंपनीने उत्पादित केलेल्या अन्न नमुन्यामध्ये किटकनाशकाची व बॅक्टेरियाबाबतची चाचणी करण्याचे आदेश तत्कालीन राज्यमंत्री महोदयांनी दिले होते. अन्न व औषध प्रशासन विभागाने किटकनाशक व बॅक्टेरियाची तपासणीची सोय नसलेल्या प्रयोगशाळेत पाठवुन किटकनाशक व बॅक्टेरियाची तपासणी न करता नमुने निर्दोष असल्याचे प्रमाणपत्र दिले व सभागृहास चुकीचे उत्तर दिल्याबद्दल दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी केली असता संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन बापट यांनी दिले.

मुख्यालयातील गुप्त वार्ता विभागामार्फत हल्दीरामच्या उत्पादक कंपन्यांची सखोल तपासणी केली जाईल, यात स्थानिक अधिकाऱ्यांना बाजुला ठेवले जाईल, तसेच तपासणीसाठी पुन्हा नमुनेघेऊन बॅक्टेरियल टेस्ट व किटकनाशक टेस्ट राज्याबाहेरील प्रयोगशाळेतील तपासण्याचे आश्वासनही त्यांनी मुंडे यांच्या आणखी एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले.