काकडेंच्या जावडेकरांवरील टीकेला भाजप कार्यकर्त्याचे सणसणीत उत्तर

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या दोन दिवसांपासून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांच्यात चांगलेच शाब्दिक शीतयुद्ध रंगले आहे. नुकतीच भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केल्यानंतर केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावरही प्रतिक्रिया देताना खासदार काकडे म्हणाले, पाच कार्यकर्ते मागे नसतानाही प्रकाश जावडेकरांना तर मंत्रीपदाची बंपर लॉटरी लागली आहे अशा शब्दात पलटवार केला आहे.आता काकडेंच्या या विधानाला लागलीच एका भाजप कार्यकर्त्याने सोशल मिडीयाच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. एका संधीसाधुने प्रकाशजींच्या दैदिप्यमान कामगिरीवर स्वताच्या स्वार्थासाठी शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न केला अशा शब्दात काकडेंवर हल्ला चढवला आहे.

नेमकं काय म्हणाला हा कार्यकर्ता ?

‘प्रकाश जावडेकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत.आणीबाणी विरोधात तुरुंगवास भोगला.भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून काम करण्यासाठी त्यांनी बँकेतील नोकरीचा राजीनामा दिला.पक्ष देईल ती जबाबदारी समर्थपणे पार पाडली.पुणे पदवीधर मतदारसंघातुन निवडणूक लढवून दोनदा विजय मिळविला.विधान परिषदेत अभ्यासू आमदार म्हणून ख्याती मिळविली.पदविधरांबरोबर सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविले. विविध प्रश्नांवर आंदोलने केली.राज्याच्या नियोजन मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून प्रभावी कार्य केले.उत्तम संघटक, हजरजबाबी अभ्यासू वक्ता, भाषेवरील प्रभुत्व यामुळे प्रवक्ते म्हणून राज्यात व देशात त्यांनी पक्षाची भूमिका माध्यमातून प्रभावीपणे मांडली.खासदार म्हणून राज्यसभेत उत्तम कामगिरी पार पाडली. सर्व पक्षांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध आहेत.

त्यामुळे राष्ट्रीय हिताच्या विषयात सर्व पक्षात समन्वय साधण्यासाठी प्रकाशजींवर जबाबदारी टाकण्यात येते.पाच वर्षांपूर्वी रामदासजी आठवले यांच्यासाठी जागा सोडायची म्हणून प्रकाशजींना राज्यसभेची संधी मिळाली नाही.परंतु निराश न होता पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारली.संघटन बांधणी, संवाद कौशल्य आणि निवडणूक व्यवस्थापन या गुणांवर विविध राज्यात लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळविण्यात योगदान दिले. गेली पन्नास वर्षे ते पक्ष कार्यात सक्रिय आहेत.त्यांच्या या कामगिरीचा सन्मान म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा मंत्रिमंडळात समावेश केला.आधी स्वतंत्र खाते आणि त्यानंतर कॅबिनेट म्हणून बढती मिळाली. मंत्री म्हणून महत्वाचे निर्णय घेतले. आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व केले.काल एका संधीसाधूने स्वतःच्या स्वार्थासाठी प्रकाशजींच्या दैदिप्यमान कामगिरीवर शिंतोडे उडविण्याचा प्रयत्न केला.हद्द म्हणजे मोदीजींच्या निर्णयक्षमतेवर भाष्य करण्याची मजल या महाशयांनी गाठली.