पुण्यातील मानाच्या बाप्पांच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण

पुणे : मागील गेल्या 11 दिवस गणेश भक्त गणपती बाप्पाची मनोभावे आराधना करत होते आणि शेवटी तो दिवस उद्या उजाडत आहे. ऊद्या बाप्पांचं विसर्जन होणार आहे. त्यामुळे पुण्यातील पाच मानाच्या गणपतींची भव्य विसर्जन मिरवणुकीची तयारी पूर्ण झाले आहे.

कशी असेल मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक ?

मानाचा पहिला कसबा गणपती
ग्रामदेवता व मानाचा पहिला कसबा गणपती मंडळाची विसर्जन मिरवणूक सकाळी 9 वाजता मंडळाच्या सभा मंडपातून निघेल. त्यानंतर 10.30 वा. पालकमंत्री गिरिष बापट व महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते श्री च्या मूर्तीस आणि लोकमान्य टिळकांच्या पुळ्यास पुष्पहार अर्पण करून मंडई येथून प्रमुख मिरवणूकीस प्रारंभ करणार आहेत. कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणूकीत रमनबाग प्रशालेच ढोल पथक आर्ट ऑफ लिविंगचे पथक, कामयानी विद्या मंदिरी, प्रभात ब्रास बॅन्डचा सहभाग असणार. परंपरे प्रमाणे पालखतून मिरवणूक निघणार आहे.

मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी मंडळाची मिरवणूक सकाळी 10.45 वा. मंडई येथील टिळक पुतळ्यापासून निघेल. मिरवणूकीत सतीश आढाव यांचे नगारावादन न्यु गंधर्व ब्रास बॅन्ड, शिवमुद्रा, ताल आणि शौर्य ढोल ताशा पथक, सिंबायोसिस ईशान्य केंद्राच्या पूर्वोत्तर राज्यातील विद्यार्थ्यांचे लोककला सादरीकरणार आहेत. पालखीतून मिरवणूक निघणार आहे.

मानाचा तिसरा गुरूजी तालीम गणपती
मानाच्या तिसऱ्या गुरूजी तालीम मंडळाच्या विसर्जन मिरवणूकीय सुरूवात सकाळी 11.00 वा. मंडईतील टिळक पुतळ्यापासून सुरूवात होईल. जयंत नगरकर यांचे यांचे नगारावादन, नादब्रम्ह, चेतक, शिवगर्जना ढोल ताशा पथकाचा समावेश असणार आहे. सुभाष सरपाळे व स्वप्निल सपकाळे यांनी तयार केलेल्या फुलांचा रथामध्ये ‘श्रीं’ची मुर्ती विराजमान होणार आहे.

मानाचा चौथा गणपती तुळशीबाग
मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मंडळाच्या मिरवणुकीला 11.15 वा. टिळक पुतळ्यापासुन सुरूवात होईल. मिरवणुकीत लोणकर बंधुचे नगारावादन, स्वरूपवर्धिनी, गजलक्ष्मी ढोल ताशा पथकांचा समावेश असणार आहे. गरूडाच्या आकाराचा फुलांचा आकर्षक रथामध्ये ‘श्रीं’ची मूर्ती विराजमान असणार आहे.

मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीच्या मिरवणूकीस सकाळी 11.20 वा. मंडईतील टिळक पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून प्रारंभ होणार आहे. मिरवणूकीत प्रताप बिडवे यांचे सनई चौघडा वादन, समर्थ प्रतिष्ठान, श्रीराम, शिवमुद्रा ढोल ताशा पथक यांचा समावेश असणार आहे. ही मिरवणुक मंडई येथील टिळक पुतळा, समाधान चौकमार्गे लक्ष्मी रस्ता, टिळक (अलका) चौक, खंडोजीबाबा चौक मार्गे विसर्जन घाटाकडे जाणार आहेत.

अखिल मंडई गणपती
अखिल मंडई मंडळाच्या शारदा गणपतीच्या मिरवणूकीस सांयकाळी सात वाजात सुरुवात होणार असून तुळजाभवानी आईचा जगदंबा रथ हे मिरवणूकीचे आकर्षण असणार आहे. विसर्जन मिरवणूकीत न्यू गंधर्व ब्रॉस बॅन्ड, शिवगर्जना ढोल ताशा पथक, नुमवि वाद्य पथक ही पथके सहभागी होणार आहेत

दगडूशेठ हलवाई गणपती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूकीला उद्या सायंकाळी सुरुवात होणार आहे. यंदा धुम्रवर्ण रथामध्ये दगडूशेठचे बाप्पा विराजमान होणार असून मोती रंगांच्या लाखो दिव्यांनी हा रथ उजळून निघणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली. शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्यानिमित्त मिरवणुकीच्या अग्रभागी पर्यावरण रथ असणार आहे. त्यामध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारे फलक लावण्यात येणार असून याद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच विनायक देवळणकर यांचा नगारा, दरबार बॅंड, प्रभात बॅंड आणि स्वरुपवर्धिनी पथक मिरवणुकीत सहभागी होणार आहे.