लोकसभा आचारसंहितेपूर्वी धनगर समाजाला आरक्षण द्या, अन्यथा पायउतार व्हा

बीड: आगामी लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी सरकारने धनगर समाजाच्या अनुसूचित जाती आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अन्यथा आगामी काळात धनगर समाज भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाईल. असा इशारा धनगर समाज संघर्ष समितीचे बीड जिल्हाध्यक्ष दत्ता वाकसे यांनी दिला आहे. वाकसे यांनी प्रसिद्धी पत्रक काढत भाजप सरकारने 2014 निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पाळण्याची मागणी केली आहे.

धनगर समाजाच्या एसटी अनुसूचित जातीच्या आरक्षण प्रश्नी 2014 निवडणुकी आगोदर धनगर समाजाने पंढरपूर ते बारामती अशी पायीं पदयात्रा काढली होती या पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र भर आंदोलने, मोर्चा, रस्ता रोको, यासह विविध आंदोलने करण्यात आली. महाराष्ट्र भर आंदोलन पेटले असताना बारामती येथे धनगर समाजाचे समाज बांधव उपोषणाला बसले होते, त्या ठिकाणी जाऊन भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते की एकी कोटी धनगर समाज बांधवांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना मते दिली आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले तर महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या एसटी अनुसूचित जातीच्या आरक्षणाचा प्रश्न पहिल्या कँबिनेट बैठकीत मार्गी लावू. परंतु महाराष्ट्र सरकारच्या कार्यकाळ संपत आली तर धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावलेला नसल्याचं प्रसिद्धी पत्रकात सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिते आगोदर धनगर समाजाला एसटी अनुसूचित जातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी केली नाही तर धनगर समाज महाराष्ट्रातील प्रभावी मतदारसंघात उमेदवार उभे करेल. तसेच भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा इशारा धनगर समाज संघर्ष समितीकडून देण्यात आला आहे.