बारामतीमध्ये महायुतीला धक्का, रासपच्या बारामती लोकसभा प्रमुखाचा राजीनामा

टीम महाराष्ट्र देशा : बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने जोर लावला आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये बारामती जिंकायचीच असा निर्धार भाजप नेत्यांनी केला आहे, मात्र मतदानाला काही दिवसच शिल्लक असताना महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या रासपला धक्का बसला आहे. रासप चे बारामती लोकसभा प्रमुख बापूराव सोलनकर यांनी राजीनामा दिला आहे.

सोलनकर यांनी पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्याकडे राजीनामा दिला आहे. पक्षामध्ये अनेक पदाधिकारी काम न करता केवळ कुरघोड्या करतात, त्यामुळे अनेक पदाधिकारी पक्षातून बाहेर पडले आहेत, महादेव जानकर देखीलं या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. अनेक पदाधिकारी पक्ष वाढवण्या ऐवजी पक्षाला संपवण्याचे काम करीत आहेत. पक्षाकडे फारसे कार्यकर्ते ही राहिले नसल्याची भावना सोलनकर यांनी यांनी व्यक्त केली आहे.

सोलनकर हे चळवळीतील कार्यकर्ते आहेत त्यांचा पुणे जिल्ह्यामध्ये मोठा संपर्क आहे. मध्ये राष्ट्रीय समाज पक्ष वाढविण्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे, ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात राजीनामा हा रासपला धक्का मानला जात आहे.

दरम्यान बारामती मतदार संघात रंगतदार लढत होणार असून युती आणि आघाडीचे दोन्ही उमेदवार एकमेकांना तोडीस तोड आहेत. सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध युतीकडून भाजपच्या कांचन कुल उतरल्या आहेत. कांचन कुल यांनी देखील प्रचाराचा चांगलाच जोर पकडला आहे. तर यावेळी पवारांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा फडकवणारचं असा निर्धार त्यांनी केला आहे.