‘योग्य तपासासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा राजीनामा घ्या’, प्रियंका गांधींची मागणी

नवी दिल्ली: लखीमपूर हिंसाचार प्रकरणी राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली आहे. लखीमपूर हिंसाचारातील पीडितांना लवकरात लवकर न्याय देण्यात यावा, या मागणीचं निवेदन राष्ट्रपतींना देण्यासाठी ही भेट घेण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतींच्या भेटीसाठी केवळ पाच जणांना परवानगी देण्यात आली होती.

काँग्रेसकडून लखीमपूर हिंसाचारातील मुख्य आरोपीचे पिता असल्यानं केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना तात्काळ पदावरुन हटवण्याची मागणी राष्ट्रपतींकडे करण्यात आली आहे. राहुल गांधींसह प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, गुलामनबी आझाद, ए.के.अँटनी या शिष्टमंडळानं राष्ट्रपतींची भेट घेतली. लखीमपूर हिंसाचारातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा टेनी याचे पिता जे सध्या गृह राज्यमंत्री पदावर आरुढ आहेत त्यांना पदावरून हटवण्याची मागणी राष्ट्रपतींकडे केल्याचे प्रियंका गांधी यांनी सांगितले. अजय मिश्रा टेनी गृह राज्यमंत्री पदावर असताना निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी म्हटलंय की, जेंव्हा आम्ही शहिद कुटुंबियांना भेटलो तेंव्हा समजलं की त्यांना फक्त न्याय हवाय. सिटींग जजेस द्वारा निष्पक्ष न्याय व्हावा. गृहराज्यमंत्र्यांचं निलंबन व्हावं. जोवर ते बरखास्त होत नाहीत, तोवर योग्य न्याय होणार नाही. ही फक्त शहिद शेतकरी अथवा शहिद पत्रकाराची मागणी नाहीये. तर यूपीच्या नागरिकांची, देशातील नागरिकांची मागणी आहे.’

‘देशात न्यायाची मागणी कधीच नष्ट होता कामा नये. हे सरकार असा संदेश देत आहे, की जर तुम्ही शेतकरी, गरिब, दलित असाल तर तुम्हाला न्याय मिळणार नाही. मात्र, जर तुम्ही सत्ताधारी भाजपमधले असाल तर तुमच्या कारवाई होणार नाही. राष्ट्रपतींनी आम्हाला आश्वासन दिलंय की ते आजच सरकारशी चर्चा करतील. सरकारची जबाबदारी असते की सरकारने लोकांचं ऐकावं, ही माझी काँग्रेसची नव्हे तर जनतेची मागणी आहे.’

महत्वाच्या बातम्या