घाटी रूग्णालयातील ‘बेड’ फक्त कोरोनाबाधित रूग्णांसाठीच राखीव ठेवा- आ.सतीश चव्हाण

औरंगाबाद : कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून घाटी रूग्णालयात फक्त कोरोनाबाधित रूग्णांवरच उपचार करता यावेत यासाठी येथील ‘बेड’ राखीव ठेवावेत व येथील अन्य आजारांच्या रूग्णांना इतर सरकारी व खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात यावे अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी आज (दि.27) जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

औरंगाबाद जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात आ.सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे की, चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर त्यांनी कोरोनाबाधित रूग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली. ज्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी तर झालाच शिवाय कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास देखील मदत झाली. कर्नाटक सरकारने हे चीन मॉडेल वापरण्याचे आदेश आपल्या सरकारी यंत्रणेला दिले आहे. यासाठी तेथील मुख्य राज्य रूग्णालयात कोरोनाबाधित रूग्णांसाठी 1700 ‘बेड’ची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच रूग्णालयातील अन्य आजार असलेल्या रूग्णांना इतर खाजगी व सरकारी रूग्णालयात ठेवण्यात येणार आहे. तेथील सर्व खाजगी रूग्णालयांनी या निर्णयास पाठिंबा देण्यास सहमती दर्शवली असून रूग्णांची काळजी घेण्याची देखील तयारी दाखवली आहे.

यामुळे रूग्णांची अधिक चांगल्या पध्दतीने काळजी तर घेता येईल शिवाय कोरोनाबाधित नसलेल्या रूग्णांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल असे आ. सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे.

इटली देशात कोरोनाबाधित रूग्ण अनेक रूग्णालयात दाखल करण्यात आले त्यामुळे या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वेगाने झाला. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून कर्नाटक सरकारने केलेल्या चीन मॉडेलचे अनुकरण आपल्या औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (घाटी) करण्यासंदर्भात आपण गांभीर्यपूर्वक विचार करावा अशी मागणी आ.सतीश चव्हाण यांनी केली आहे.