कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी रिझर्व्ह बँकेची तयारी, पेमेंट बँकेच्या मर्यादेत दुपटीने वाढ

upi

मुंबई : कोरोना रुग्ण संख्येत होत असलेल्या वाढीमुळे देशाच्या आर्थिक सुधारणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेने या संकटाचा सामना करण्याची तयारी केली आहे. त्यानुसार पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यात पेमेंट बँकेची जमा मर्यादा दुपटीने वाढवण्यात आली असून दोन लाख करण्यात आली आहे. यामुळे ऑनलाईन बँकिंगला प्रोत्साहन मिळेल. तसेच यामुळे बाजारात नगदीची कमतरता भासणार नाही.

रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे पेटीएम आणि फोन-पे सारख्या पीपीआयएस खात्यांची मर्यादा देखील दोन लाख झाली आहे. या आधी या खात्यांची मर्यादा एक लाख रुपयांची होती. याचा पेटीएम, गुगल-पे आणि फोन-पे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. मात्र, त्यासाठी केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. देशात प्रमुख पेमेंट बँकांमध्ये एअरटेल, पेटीएम आणि इंडिया पोस्ट या सारख्या प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे. या बँकांना डेबिट कार्ड देण्याची परवानगी असली तरी त्यांना क्रेडिट कार्ड देण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.

५० हजार कोटींची मदत :  रिझर्व्ह बँकेने नाबार्ड, नॅशनल हाउसिंग बँक आणि सिडबीला ५० हजार कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा देखील केलीय. त्यानुसार नाबार्डला २५ हजार कोटी रुपये, नॅशनल हाउसिंग बँकेला १० हजार कोटी रुपये आणि सिडबीला १५ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या