fbpx

आरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील : नरेंद्र मोदी

टीम महाराष्ट्र देशा : आरक्षणाच्या मुद्यावरून महाराष्ट्र भर वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक रस्त्यावर उतरले आहेत. असं असताना देखील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आरक्षणाला विरोध आहे. आणि केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारही जाती आधारित आरक्षणव्यवस्था रद्द करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहतंय, अशी चर्चा काही वर्षांपासून सुरू आहे. ‘सब का साथ सब का विकास’, हे आमचं ब्रीद असून आरक्षण जसं आज आहे, तसंच यापुढेही राहील, त्याला कुठलाही धक्का लागणार नाही, असं पंतप्रधान मोदींनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांची आणि सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.

आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याच्या मुद्यावरून देखील विरोधी पक्षातील काही लोकं बोलतात तर काही विश्वस्त किंंवा विशिष्ट क्षेत्रातील जाणकार व्यक्तीकडून ही जातीय मुद्यावरून आरक्षणाला विरोध आहे. दरम्यान, आर्थिक निकषावर आरक्षण मिळाव यासाठी पर्यंत देखील करत आहेत.

महाराष्ट्रात मराठा समाज, राजस्थानात गुर्जर, हरियाणात जाट आणि गुजरातमध्ये पाटीदार पटेल आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेत रस्त्यावर उतरले आहेत. राज्य किंवा केंद्र सरकारकडून कुठलाच ठोस निर्णय घेतला जात नसल्यानं त्यांच्यातील अस्वस्थता वाढतेय, रोष वाढतोय. त्यातच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आरक्षणाबद्दलची भूमिका वेगळी आहे. त्यामुळे भाजपा सरकारही जातीवर आधारित आरक्षण न देता, आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याचा विचार करतंय, असं अनेकदा बोललं जातं. परंतु, अशा वावड्या उठवणं हा विरोधकांचा डाव असल्याचं मोदी म्हणाले.

ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नांचा चुराडा केला, तेच लोक दुर्बल घटकांच्या मनात आमच्याबद्दल संशयाचं आणि अविश्वासाचं बीज पेरत आहेत, स्वार्थाचं राजकारण करत आहेत, असा टोलाही  नरेंद्र मोदींनी लावला. गरीब, मागास, दलित, आदिवासी, दुर्बल या सगळ्यांच्या अधिकारांचं संरक्षण व्हावं आणि बलशाली भारत घडावा, हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं. दुर्दैवानं ते अजूनही पूर्ण झालेलं नाही. ते स्वप्न साकारणं ही आपली जबाबदारी आहे आणि आरक्षण त्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यामुळे आम्ही आरक्षण रद्द करणार नाही, असं मोदींनी ठामपणे सांगितलं. निवडणुका आल्या की विरोधक आरक्षणाच्या मुद्द्यावरून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. पण जनता हुशार आहे, असंही त्यांनी नमूद केलं.