पंधरा दिवसांत रस्ते दुरुस्त करा, अन्यथा अधिकाऱ्यांना काळे फासणार: महापौर बाबासाहेब वाकळे

balasaheb vakale

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- अहमदनगर शहरातून जाणाऱ्या विविध महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून त्यामुळे रोजच अपघात होत आहेत. नेप्ती नाका ते कल्याण महामार्ग रस्ता अत्यंत खराब झालेला आहे.

महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे. नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न आपण करत आहात, असे म्हणतात महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कान टोचले आहेत. येत्या १५ दिवसात रस्ते दुरुस्त न झाल्यास अधिकाऱ्यांना दालनात बसू देणार नाही. तसेच त्यांच्या तोंडाला कोणत्याही क्षणी काळे फासले जाईल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

महामार्गांच्या दुरावस्थे प्रकरणी महापौर बाबासाहेब वाकळे चांगलेच आक्रमक झाले आहे. त्यांनी अधीक्षक अभियंत्यांना याप्रकरणी पत्र धाडले आहे. शहरातून जाणाऱ्या नगर-मनमाड, नगर-पुणे, नगर-सोलापूर, नगर-औरंगाबाद व नगर-कल्याण या महामार्गांवर मोठ्या प्रमाणात रहदारी असते.

सदर महामार्ग हे शहरातून जात असल्याने शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या पाचही महामार्गावरील रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत. या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असल्यामुळे रोज या ठिकाणी अपघात होत आहेत. सदरचे रस्ते तातडीने दुरुस्त होणे आवश्यक आहे. असे महापौर वाकळे यांनी पत्रात म्हटले आहे.

तसेच आपण व आपले अधिकारी नागरिकांच्या जीवाशी खेळत आहात. नागरिक आमच्याकडे फोनद्वारे, निवेदनाद्वारे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे सदरचे रस्ते येत्या पंधरा दिवसांत दुरुस्त करावेत. अन्यथा आपल्याला कार्यालयामध्ये बसू देणार नाही. तसेच कोणत्याही क्षणी जबाबदार अधिकाऱ्यांना काळे फासण्यात येईल, असे महापौर वाकळे यांनी पत्रात म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या :-