शिवसैनिक हत्या प्रकरण:आमदार शिवाजी कर्डिले यांची भाजपमधून हकालपट्टी करा- शिवसेना

शिवाजी कर्डिले

मुंबई- शिवसेनेचे अहमदनगर उपशहरप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे या दोघांच्या हत्येप्रकरणी आमदार शिवाजी कर्डिले यांची भाजपमधून हकालपट्टी करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. शिवसेनेच्या ४ मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेऊन हि मागणी केली.

थोड्यावेळापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक सुरु झाली या बैठकीपूर्वी ४ मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतली. नगरमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची ज्या पद्धतीने हत्या करण्यात आली,आणि आता याच प्रकरणात आ.कर्डिले यांचा हात असल्याच्या बातम्या येत आहेत या पार्श्वभूमीवर आमदार शिवाजी कर्डिलेयांची भाजपमधून हकालपट्टी करावी अशी जोरदार मागणी शिवसेनेने केली. तसेच या प्रकरणात जे जे दोषी असतील अश्या सर्वांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसारमुख्यमंत्र्यांनी जे जे दोषी असतील अश्या सर्वांवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे मात्र कर्डिले यांच्या हकालपट्टीच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय आश्वासन दिलं हे समजू शकले नाही.

काय आहे प्रकरण ?
शनिवारी 7 एप्रिल रोजी अहमदनगरमधल्या केडगाव प्रभाग क्रमांक 32 मध्ये पोटनिवडणुकीत पार पडली, मात्र याचवेळी शिवसेना शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची भरदिवसा रस्त्यावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणी राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप त्यांचे वडील आमदार अरुण जगताप, संग्राम यांचे सासरे भाजप आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर आणि त्यांचा मुलगा संदीप कोतकरसह 50 जणांवर खुनाचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.