‘आचारसंहिता लागू झाली तरी मोदींचे फलक सार्वजनिक ठिकाणी झळकतायत’

blank

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुका आता अधिकृतरित्या जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विविध राजकीय पक्षांचे सार्वजनिक ठिकाणावरचे फलक काढण्यात येत आहेत. मात्र प्रशासन भाजपचे आणि खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे फलक काढण्यास आखडता हात घेत असल्याच दिसत आहे. म्हणून कॉंग्रेसचे देश कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र लिहित पंतप्रधान मोदींचे पेट्रोल पंपावरील फलक काढण्याची मागणी केली आहे.

निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणुकीच्या घोषणेनंतर राज्यभरात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासनाने विविध राजकीय पक्षांचे परवानग्या घेऊन लावलेले फलक काढले आहेत. आचारसंहितेनुसार फलक काढण्यावर कुणाचाही आक्षेप नाही, पण या नियमानुसार सर्वच राजकीय फलक निवडणूक आयोगाने काढणे अपेक्षित आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले फलक आजही राज्यातील बहुतांश पेट्रोलपंपांवर लावलेले आहेत, असे सचिन सावंत यांनी पत्रात लिहिले आहे. तर सर्व राजकीय पक्षांसाठी एकच नियम असताना या फलकांबद्दल प्रशासन बोटचेपी भूमिका का घेत आहे? असा सवाल सचिन सावंत यांनी विचारला आहे.

दरम्यान महाराष्ट्र आणि हरयाणातील विधानसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुक ही एकाच टप्यात होणार आहे. 21 ऑक्टोबरला मतदान होणार आहे. तर मतमोजणी ही 24 ऑक्टोबरला होणार आहे. महाराष्ट्रातील सर्व म्हणजे 288 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 27 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर अशी असणार आहे. अर्जाची छाननी 5 ऑक्टोबर, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख 7 ऑक्टोबर पर्यंत असणार आहे.

महत्वाच्या बातम्या