Sunglasses: सनग्लासेस निवडताना लक्षात ठेवा

उन्हाळा आला की, आपल्याला आठवण येते ती सनग्लासेसची. विशेषतः तरुणांमध्ये या सनग्लासेसची क्रेझ जास्त पहायला मिळते. आपल्याकडे जसे ब्रँडेड सनग्लासेस मिळतात, तर रस्त्यावर स्वस्तात मस्त स्टाईलिश असे सनग्लासेस देखील मिळतात. त्यातून एखाद्या हिरो-हिरोईनची सनग्लासेसची स्टाईल आपल्याला आवडली की, आपण तशाच प्रकारचे सनग्लासेस घेतो. पण कधी-कधी तिथेच चुकतो. कारण ते आपल्या चेहर्‍यावर साजेसे दिसतच नाहीत. म्हणूनच सनग्लासेसची निवड करताना कोणत्या गोष्टी महत्वाच्या असतात. त्यावर एक नजर टाकुयात…
 •  साधारण आपल्या चेह-याचे आकार बदामाकृती, गोलाकार, अंडाकृती आणि चौकोनी असे असतात. तुमच्या चेहर्‍याचा आकार कोणता हे पहिलं शोधा. साधारण चौकोनी चेहर्‍याची माणसं सोडली तर सगळ्यांना रेट्रो स्क्वेअर आकारातले सनग्लासेस छान दिसतात.

 

 •  वेगवेगळ्या स्टाईलचे सनग्लासेस निवडताना आपल्या चेहर्‍याची ठेवण कशी आहे हे लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे सनग्लासेसची निवड करा. बदामी, गोलाकार चेहर्‍याच्या माणसांना कॅट आय सनग्लासेस, अंडाकृती, चौकोनी चेहर्‍याच्या माणसांना एव्हिएटर प्रकारचे सनग्लासेस छान दिसतात. त्याचप्रमाणे अंडाकृती चेहर्‍यांच्या माणसांना ओव्हर साईझ सनग्लासेस देखील छान दिसतात.
 • सनग्लासेसचा एकदा आकार ठरला की, मग कोणत्या रंगाचे सनग्लासेस निवडायचे ते ठरवा. हा रंग ठरवताना देखील आपल्या त्वचेचा रंग लक्षात घ्या. स्कीन टोन दोन प्रकारचे असतात एक कूल आणि दुसरा वॉर्म स्कीन टोन. जर तुमच्या त्वचेचा रंग साधारण गुलाबी असेल आणि हातांच्या नसांचा रंग निळा असेल तर तुमचा स्कीन टोन कूल आहे. जर त्वचेचा रंग सोनेरी किंवा बदामी असेल आणि हातांच्या नसांचा रंग हिरवा असेल तर तुमचा स्कीन टोन वॉर्म आहे असे समजावे.
 • कूल स्कीन टोनच्या व्यक्तींनी निळ्या रंगछटेच्या सनग्लासेसची निवड करावी आणि गुलाबी, करडा, काळा, गुलाबी, जांभळ्या किंवा प्रिंटेड रंगछटा असेल्या फ्रेम निवडाव्यात.
 • वॉर्म स्कीन टोनच्या व्यक्तींनी पिवळ्या रंगछटेच्या सनग्लासेसची निवड करावी.
 •  तसेच सनग्लासेस निवडताना ते युव्ही प्रोटक्टेड आहेत की नाही हे पाहून घ्यावे. कारण सनग्लासेसचा उपयोग डोळ्यांचे उन्हापासून रक्षण करणे हा आहे. रस्त्यावरून चालताना बिल्डिंग, गाडीच्या काचा यावरून प्रकाश परावर्तित होऊन तुमच्या नाजूक डोळ्यांवर पडत असतो. त्यामुळे डोळ्यांना याचा त्रास होऊ शकतो.
 • युव्ही प्रोटेक्टेड सनग्लासेसच्या लेन्सवर विशिष्ट प्रकारे प्रक्रिया केली जाते. यामुळे सूर्यापासून निघणारे प्रकाशकिरण परावर्तित होतात आणि डोळ्यांना थंडावा मिळतो.
 •  सनग्लासेसच्या लेन्स ग्रीन, ब्राऊन, यलो, ब्ल्यू, ग्रे आणि पिंक अशा रंगात येतात. या रंगांचा वेगवेगळा उपयोग आहे. ग्रीन रंगाचे सनग्लासेस हे सगळ्याच ठिकाणी वापरायला योग्य आहेत. हे तुम्ही पावसाळ्यात आणि सूर्यप्रकाशात देखील वापरू शकता.
 •  ब्राऊन किंवा अंबर रंगाचे सनग्लासेस ढगाळ किंवा प्रखर उन्हाच्या ठिकाणी वापरण्यासाठी योग्य आहे. तुम्ही जर आउटडोर स्पोर्ट अ‍ॅक्टिव्हिटी करत असाल तर अशा रंगाचे सनग्लासेस घ्या.
 •  तुम्ही गिर्यारोहणाला किंवा थंड हवेच्या ठिकाणी राहत असाल किंवा फिरायला जात असाल तर यलो शेडचे सनग्लासेस घ्या, कारण या सनग्लासेसमुळे धुसर ठिकाणी स्पष्ट दिसण्यास मदत होते.
 •  जर तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल तर निळ्या काचेचे सनग्लासेस वापरणे टाळा.
 •  सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही 3 ते 4 तासांहूनही अधिक काळ उन्हात फिरत असाल तर रस्त्यावरून घेतलेले स्वस्त सनग्लासेस वापराने टाळा. कारण यामुळे तुमच्या नाजूक डोळ्यांना त्रास होऊ शकतो.