खावटी कर्जमाफीने लाखो आदिवासी बांधवांना दिलासा : विष्णू सवरा

मुंबई : आदिवासी बांधवांच्या खावटी कर्जमाफीने राज्यातील लाखो आदिवासी बांधवांना दिलासा मिळाला असून हा शासनाचा एक महत्त्वपूर्ण निर्णय असल्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी सांगितले. काल राज्य मंत्रिमंडळाने आदिवासी अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजुरांना आदिवासी विकास महामंडळाकडून खावटी कर्जापोटी देण्यात आलेले 244.60 कोटींचे कर्ज आणि त्यावरील 116.57 कोटींचे व्याज अशा एकूण 361 कोटी 17 लाख रुपयांची रक्कम माफ करण्यास मंजुरी दिली आहे.

आदिवासी अल्पभूधारक शेतकरी व शेतमजूर हे अत्यंत दुर्गम भागातील असल्याने त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. 2009 ते 2014 या कालावधीत कर्ज घेतलेल्या 11 लाख 25 हजार 907 शेतकरी-शेतमजुरांना या निर्णयाचा लाभ होणार आहे आदिवासी उपयोजना क्षेत्रातील अल्पभूधारक व शेतमजूर यांना साधारणत: जून ते सप्टेंबर या काळात रोजगार नसल्याने या आदिवासी बांधवांना मदत म्हणून खावटी कर्ज दिले जाते. ऐपत नसल्याने त्याची परतफेड होत नाही. परिणामी कर्जाची रक्कम वाढते व पुढील कर्ज मिळू शकत नाही, म्हणून हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे. यानुसार नाशिक, जव्हार, नंदुरबार, यवतमाळ, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, अहेरी व जुन्नर येथील प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या लाभार्थ्यांना याचा लाभ होणार आहे.

आदिवासी विकास महामंडळाने 2009 ते 2014 या कालावधीत 244 कोटी 60 लाख रुपयांचे कर्ज वाटप केले. या कर्जासह त्यावरील 116 कोटी 57 लाख रुपयांचे व्याज थकित आहे. असे एकूण 361 कोटी 17 लाख रुपयांची रक्कम माफ करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.