दंगलीमुळे बाधित झालेल्या दंगलग्रस्तांना मदत देण्याचा शासन निर्णय जारी

टीम महाराष्ट्र देशा : १ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे दोन गटात झालेल्या वादातून जाळपोळ आणि दगडफेक होवून एका तरूणाला आपला जीव गमवावा लागला होता. एक जण जखमी तर दोन व्यक्तींच्या घरांचे नुकसान झाले होते. या दंगलीमुळे बाधित झालेल्या आपदग्रस्तांना मदत देण्याचा शासन निर्णय जारी झाला असून, एकूण ५ लाख ७५ हजाराची मदत देण्यात आली आहे.

शासनाच्या नियमानुसार मृत राहुल फटांगडे यांच्या वारसांना ५ लाख रूपये, जखमी राहुल बोंगाडे यांना ५ हजार रूपये तर आठवले एंटरप्रायजेस आणि संजय मुधा यांच्या घर दुरूस्तीसाठी प्रत्येकी ३५ हजार रूपये आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी दोन गटात झालेल्या वादातून कोंढापूरी, वढू, सणसवाडी येथे जमावा मध्ये झालेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत राहुल फटांगडे या तरूणाचा मृत्यू झाला तर; राहुल बोंगाडे जखमी झाले होते. तसेच आठवले एंटरप्रायजेस, संजय मुधा, सुरेश सकट यांच्या घराचे नुकसान झाले होते. दंगलीमुळे बाधित झालेल्या आपदग्रस्तांना मदतीची घोषणा सरकारने केली होती.त्यानुसार महसूल व वन विभागाने मदतीचा शासन निर्णय जारी केला आहे.