‘ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारविरोधात खटला दाखल करावा’

संजय राऊत

नवी दिल्ली- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले नसल्याची आश्चर्यजनक माहिती आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत दिली आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश हे कोरोनाच्या काळातील मार्गदर्शक सुचनाप्रमाणे मृत्युची आकडेवारी केंद्र सरकारला सादर करतात. या आकडेवारीनुसार ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेले नाहीत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्यसभेत दिली आहे.

आरोग्य हा राज्याचा विषय असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत दिलेल्या माहितीत म्हटले आहे. केंद्र सरकारने ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेले नसल्याचा दावा केल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून तिखट प्रतिक्रिया उमटल्या आहेत.सरकारच्या या उत्तरावर शिवसेना नेते संजय राऊत प्रचंड संतापले आहेत. केंद्र सरकार सत्यापासून दूर पळत आहे. हे सरकार भ्रमिष्ट झालं असून ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारवर खटलाच दाखल केला पाहिजे, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.

राऊत म्हणाले, ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजन अभावी मेले, जे मेडिकल सिलिंडरसाठी इकडे तिकडे हिंडत होते, त्यांचा यावर विश्वास बसतोय का हे सांगायला हवं. सरकार खोटं बोलत आहे. ऑक्सिजन अभावी अनेक राज्यांमध्ये जे मृत झाले त्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल केला पाहिजे. उत्तर लेखी असेल किंवा मौखिक असेल पण सरकार सत्यापासून दूर पळत आहे. हा पेगाससचा परिणाम आहे. सरकार भ्रमिष्ट झालं आहे, असा घणाघाती हल्ला राऊत यांनी चढवला.

महत्त्वाच्या बातम्या

IMP