चिखली : आघाडीला धक्का देत रेखाताई खेडेकर घेणार भाजपचा झेंडा हाती ?

टीम महाराष्ट्र देशा- बुलडाणा जिल्ह्यातील चिखली मतदार संघातून भाजपकडून निवडणूक लढविण्यासाठी रेखाताई खेडेकर पुन्हा एकदा सक्रिय झाल्या आहेत. आघाडीसाठी हा मोठा धक्का मनाला जात असून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या खेडेकर भाजपमध्ये प्रवेश करून चिखलीतून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे.

दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार,रेखाताई यांनी सलग तीन वेळा या मतदार संघातून भाजपचे प्रतिनिधीत्व केले आहे. मात्र त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. परंतु, आता त्या पुन्हा एकदा भाजपकडून चिखलीतून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. कॉंग्रेसचे विद्यमान आमदार राहुल बोंद्रे हे या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत.

लोकसभा निवडणुकीत भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीत अशीच परिस्थिती असेल का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. त्यातच ऐन निवडणुकांच्या तोंडावर रेखाताई खेडेकर यांची घरवापसी होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरल्याने काँग्रेस तसेच राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे.

खेडेकर या मंत्री गिरीष महाजन यांच्या संपर्कात असल्याचे विश्वसनिय वृत्त असून त्यांच्या भाजपात घरवापसी जोरदार चर्चा आहे. त्यांच्या मते रेखाताईची घरवापसी झाल्यास भाजपातील अंतर्गत गटबाजीला लगाम बसून भाजपाचा बालेकिल्ला पुन्हा एकदा अभेद्य राहू शकतो.