रजिस्ट्रीसाठी साक्षीदाराची गरज नाही

marriage-registration

औरंगाबाद  : ‘येत्या 15 ऑक्टोबरपासून प्‍लॉट, फलॅट खरेदी-विक्री व्यवहाराची रजिस्ट्री करण्यासाठी साक्षीदाराची गरज राहणार नाही. त्या ऐवजी खरेदी-विक्री करणा-यांचे आधार कार्ड आवश्यक ठरेल,’ अशी माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

कवडे म्हणाले, ‘विभागात संगणकीकृत प्रणाली आणण्यात आली असून आय-सरिता, ई सर्च, ई रजिस्ट्रेशन, ई म्युटेशन, ई मॅरेज रजिस्ट्रेशन, दस्त पडताळणी-एसएमएस सेवा, ई पेमेंट, स्टॅम्प ड्युटी कॅल्युलेटर अशा विविध सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

रजिस्ट्री करण्यासाठी येणा-या नागरिकांना कमीत कमी वेळ कार्यालयात लागेल अशी यंत्रणा राबवण्याचा प्रयत्न आहे. नागरिकांच्या सोयीसाठी ई व्हॅल्यूवेशन, ई मॅरेज रजिस्ट्रेशन या सुविधा येत्या महिनाभरात सुरू होतील.

नोंदणी पद्धतीने विवाह करू इच्छिणा-या तरुण-तरुणींना ऑनलाइनद्वारेच अर्ज करता येईल. यासाठी नियोजित वधूवर संकेतस्थळावरून नोटीसची डेटाएन्ट्री करतील. स्वतःचे फोटो, अंगठ्याचे ठसे देऊन कागदपत्रे अपलोड करतील. तसेच ऑनलाइन फी, नोटीस भरून देतील. की नोटीस विवाह अधिका-यांना ऑनलाइन मिळेल.

ई व्हॅल्युवेशनद्वारे एखाद्या गटातील जागेची, प्‍लॉटची व्हॅल्यू काय आहे, त्यासाठी किती शुल्क भरावे लागेल याची माहिती घेता येईल. शिवाय रजिस्ट्रीसाठी आगाऊ नोंदणी करून वेळ व तारीखही घेता येणार आहे. या सुविधांचा नागरिकांनी जास्तीत जास्त वापर करावा,’ असे आवाहन त्यांनी केले.