मराठा आरक्षणा संदर्भात विनायक मेटेंची एकला चलो रे भूमिका

शरद पवार साहेबांवर टीका करण्याची मेटे यांची औकातच काय ? - अमरसिंह पंडीत

टीम महाराष्ट्र देशा :-  मराठा आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करण्याच श्रेय घेण्यासाठी अनेक नेते सरसावलेले पाहायला मिळतात त्यात शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे ही आघाडीवर आहे. राज्यभर मराठा मोर्चे काढले गेले त्यासाठी मीच पुढाकार घेतल्याचं मेटे यांनी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात सांगितलं आहे. देशातील आरक्षण चळवळ एकत्र आणण्यासाठी दिल्लीत ऑल इंडिया जॉईट रिझर्वेशन कमिटी स्थापन  केल्याची घोषण विनायक मेटे यांनी एका प्रसिद्धी पत्रकामार्फत दिली त्यामुळे राज्याचा लढा देशपातळीवर घेऊन जात मराठा आरक्षणाबाबत मेटेंनी वेगळी चूल मांडली आहे.
महाराष्ट्रामधील मराठा, गुजरात मधील पटेल, आंध्राप्रदेश व तेलंगणा मधील कापू समाज, हारियाणा मधील जाट तर राजस्थान मधील गुजर, जाट याच बरोबर अन्य राज्यातील आरक्षण चळवळी मधील नेते मंडळी आज दिल्ली येथे एकत्र आले होते. या बैठकीला महाराष्ट्रातून विनायक मेटे आणि तानाजीराव शिंदे यांनी हजेरी लावली. कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा लढा आम्ही राज्यव्यापी केला,जातीय तत्त्वावर आरक्षण न मागता आर्थिक मागास तत्वावर आरक्षण मिळावा यासाठी प्रयत्न केले. आताही आमचा लढा सुरु असून या चळवळीमुळे मराठा आरक्षण आंदोलनाला मोठी ताकद निश्‍चित मिळेल असही त्यांनी यावेळी सांगितलं.

शरद पवार साहेबांवर टीका करण्याची मेटे यांची औकातच काय ?

दरम्यान महाराष्ट्र देशाने आ. अमरसिंह पंडीत यांची प्रतिक्रिया जाणून घेतली-  शरद पवार यांच्यावर टीका केली की बातम्या होतात हे तंत्र विनायक मेटे यांना चांगलं अवगत असल्याने त्यांनी शरद पवार यांनी आर्थिक निकषांवर आरक्षणासंदर्भात जे मत पुण्यातील महामुलखतीत व्यक्त केलं त्याला मेटे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला जोडण्याचा प्रकार केला असल्याचा टोला आमदार अमरसिंह पंडित यांनी लगावला आहे त्याच बरोबर विनायक मेटे जर आरक्षणाच्या संदर्भात आक्रमक भूमिका घेत असतात तर मी स्वतः त्यांना पाठिंबा देईन मात्र काही कारण नसताना काही लोकांना पवार साहेबांवर टीका करण्याची सवय लागली आहे त्यांची औकातच काय असा सवाल पंडित यांनी उपस्थित केला आहे.

सरकार मधून बाहेर पडण्याची हिम्मत दाखवा
आरक्षणासंदर्भातीला शरद पवारांच्या भाष्यावर आ मेटेंनी टीका केली होती यावर आ पंडित यांनी सोशल साईट्स वर खुले आवाहन दिले आहे. ‘विनायकराव एक विनंती करतो तुम्हाला, गल्लीत बसून पेपरबाजी करण्याऐवजी राज्याच्या सर्वोच्च पंचायतीमध्ये ( विधानपरिषद अधिवेशनात) हिम्मत असली तर एक आवाहन करा आणि सरकारला हे अधिवेशन संपायच्या आत आरक्षण जाहीर करावे, नसता मी वेगळा विचार करेल असे बोलण्याची हिंमत दाखवा, मेटे साहेब,हे तुम्ही करू शकणार नाहीत कारण तुम्हाला मंत्री व्हायचेय’.
आमदार पंडितांच्या या आव्हानानंतर आरक्षणाचं श्रेय घेऊ पाहणाऱ्या आणि एकला चलोरे ची भूमिका अवलंबनारे मेटे हे आव्हान स्वीकारतात का हे पहाण महत्त्वाचं ठरेल.

आ. अमरसिंह पंडीत यांची फेसबुक पोस्ट-

मनसेचे सर्वेसर्वा मा.श्री राज ठाकरे यांनी दिनांक २२ रोजी सायंकाळी जागतिक मराठी अकादमी व बी.व्ही.जी.आयोजित ‘ शोध मराठी मनाचा ‘ या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा.खा.श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांची मुलाखत घेतली, ही महामुलाखत उभ्या महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेने पाहिली.

मा.श्री राज ठाकरे यांनी बहुतांश मुद्द्यांना स्पर्श करत अनेक प्रश्न विचारले.वय वर्ष ७५ ओलांडल्यानंतरही अतिशय शांत आणि संयमाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासहित अनेक नेत्यांमध्ये घडलेल्या घटनांचा दाखला देत ही मुलाखत झाली. विशेष म्हणजे पवारसाहेबांचे महाविद्यालयीन शिक्षण ज्या कॉलेजमध्ये झाले त्याच कॉलेजच्या मैदानावर मा. पवार साहेबांची मुलाखत सुमारे २५ हजार श्रोत्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली.

आजच्या दैनिकामध्ये आमदार विनायकराव मेटे यांनी मा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या संदर्भात जे विधान केले ते सर्वार्थाने निषेधार्य आहे.मेटेंनी केवळ मराठा समाजाच्या मनात आस्था निर्माण करण्याच्या हेतूने आणि भाजपाच्या नेत्यांना खूश करण्यासाठी हा सगळा प्रपंच केला आहे,हे नव्याने सांगण्याची गरज नाही.

आरक्षणाच्या संदर्भात मा. श्री राज ठाकरे यांनी प्रश्न विचारला होता की, आरक्षण देऊनही अनेक लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत, संधी मिळत नाही आणि त्यामुळे युवा पिढी दिवसेंदिवस नाउमेद होत चालली आहे. त्यावर आपली प्रतिक्रिया देत पवार साहेब म्हणाले की, गरजूंना आर्थिक निकषावर आधारित आरक्षण मिळायला हवे होते. त्यांनी केलेले भाष्य विशिष्ट समाजाविषयी नव्हते परंतु आज पर्यंत केवळ आणि केवळ मराठ्यांना आरक्षण या विषयावर उभ्या महाराष्ट्रातील मराठा समाजाचे मीच नेतृत्व करतो असे मेटे समजत असतील तर तो त्यांचा गैरसमज आहे. मला त्यांची कीव येते.

मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून समाजातील काही तरुण मुले मुली हे रस्त्यावर आले..शेकड्याने जमा झाले.. हजारांनी निघाले आणि लाखाने एकवटले हे केवळ विद्यमान राज्यकर्त्यांच्या विरोधात आरक्षणाच्या मुद्यावर संताप व्यक्त करण्यासाठी. या मोर्चाचे श्रेय जर विनायकरावजी आपण घेत असताल तर ते चुकीचे होईल.

या सरकारला आपण पाठिंबा दिलेला आहे किंबहुना विधानपरिषदेचा उमेदवार म्हणून ज्या भारतीय जनता पक्षाचे नाव आपण आपल्या नाम निर्देशनपत्रात लिहिलेले आहे (भले बाहेर आपण शिवसंग्राम पक्षाचे आमदार म्हणत असाल) त्या पक्षाच्या नेतृत्वाला विचारा की मराठ्यांना आरक्षण कधी देणार ? आरक्षणाचे मोर्चे निघत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सहित सर्व कार्यकर्ते या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर आले होते, हे मी तुम्हाला नव्याने सांगण्याची गरज नाही.

विनायकराव एक विनंती करतो तुम्हाला, गल्लीत बसून पेपरबाजी करण्याऐवजी राज्याच्या सर्वोच्च पंचायतीमध्ये ( विधानपरिषद अधिवेशनात) हिम्मत असली तर एक आवाहन करा आणि सरकारला हे अधिवेशन संपायच्या आत आरक्षण जाहीर करावे, नसता मी वेगळा विचार करेल असे बोलण्याची हिंमत दाखवा, मेटे साहेब,हे तुम्ही करू शकणार नाहीत कारण तुम्हाला मंत्री व्हायचेय…

असो,आरक्षणाच्या नावावर पवार साहेबावर चिखलफेक करण्याऐवजी नजीकच्या काळात आपण आपले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे सरकार काय दिवे पाजळतात यांच्याकडे ही युवा पिढी लक्ष देऊन आहे.

विनायक मेटे हे अमरसिंह पंडीतांचे आव्हान स्वाकारतील का?

आमदार पंडितांच्या या आव्हानानंतर आरक्षणाचं श्रेय घेऊ पाहणाऱ्या आणि एकला चलोरे ची भूमिका अवलंबनारे मेटे हे आव्हान स्वीकारतात का हे पहाण महत्त्वाचं ठरेल.