सगळयांचे पैसे परत करणार-डी.एस.कुलकर्णी

पुणे – मी सगळयांचे पैसे परत करणार आहे. माझ आयुष्य पारदर्शक असून मी कधीही काहीही लपवलेलं तसेच कोणालाही फसवलेलं नाही असा दावा डी.एस.कुलकर्णी यांनी आज केला.पैसे माघारी कधी देणार याचा प्लॅन गुरुवारी कोर्टसमोर मांडणार असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं.

डीएसकेंवर पुणे, मुंबई आणि कोल्हापुर येथे गुंतवणुकदारांच्या हिताचे संरक्षण अधिनियमाखाली गुन्हे दाखल झाले आहेत. सुमारे ३५०० एफडी धारकांनी आपल्या तक्रारी आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल केल्या आहेत. या गुंतवणूकदारांचे सुमारे २०० कोटी रुपये या प्रकरणात अडकले आहेत.हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले डी.एस.कुलकर्णी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली . मल्ल्या प्रमाणे मी पळून जाणार नाही तर खंबीरपणे आलेल्या संकटांचा सामना करणार तसेच सर्व आरोपांना उत्तरं देखील देणार आहे .

ऑक्टोबर 2016 म्हणजेच नोटबंदीनंतर व्यवसायाला उतरती कळा लागल्याच कुलकर्णी यांनी म्हटलं आहे . नोटबंदीचा फटका 2 वर्षे सहन करावाच लागतो. सिस्टीम बदलली जात असेल तर असे निर्णय गरजेचे असून बाजारातील काळा पैसा बाहेर आल्यास देशाच्या विकासाला चालना मिळेल असा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला. एकेकाळी मी पेपर टाकत होतो त्यानंतर मी मोठा झालो. त्यामुळे मीडियाशी माझे जवळचे संबंध आहेत. मीडियानेच मला मोठा केला. माझ्याबद्दल भरपूर अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे मी स्वत:च माध्यमांसमोर आलो असे डी.एस.कुलकर्णी यांनी सांगितलं.

दरम्यान डीएसके यांच्या मालमत्तेवर आता बँकांनी ताबा घेण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे पैसे भरूनही ताबा न मिळाल्याने असंख्य फ्लॅटधारकानी फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. तसेच एकच फ्लॅट बँकांकडे गहाण असताना तो परस्पर विकल्या ची प्रकरणे पुढे येऊ लागली आहेत. त्यामुळे आज डीएसके नेमके काय सांगणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते .एफडी धारकांच्या गुन्ह्याबरोबरच डीएसके आणि त्यांच्या कंपन्यांच्या चार संचालकांवर कर्मचाऱ्यांचा निर्वाह भत्ता न भरता अपहार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत सुरेंद्र जयसिंह फाळके यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार डी. एस. कुलकर्णी यांच्यासह संचालक विजयकुमार नथू जगताप, सहिंद्र जगन्नाथ भावळे आणि शन्मुख सोमेश्वर दुर्वासुला यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी डीएसके यांच्या फसवणुकीची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन केले असून त्यांचा तपास जोरात सुरू आहे.

पहा काय म्हणाले डी.एस.कुलकर्णी