शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्यांच्या आरोपाचा संदर्भ देत भाजपची पीकविमा वाटप चौकशीची मागणी

वैजापूर : गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे तालुक्यातील बहुतांश भागात पिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर शेतकरी प्रधानमंत्री किसान विमा योजनेत विमा कंपनीकडून देण्यात आलेली नुकसान भरपाई निकषाप्रमाणे मिळालेली नाही. शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी देखील विमा कंपनीवर गंभीर आरोप करत शेतकऱ्यांना एक हजार कोटी रुपयेच वाटप करून तब्बल चार हजार ८०० कोटी रूपयांचा नफा विमा कंपनीने लाटल्याचा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपाचा संदर्भ देत राज्य सरकारने पीकविमा वाटपाची सखोल चौकशी करण्याची मागणी येथील भाजपा पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

यासंदर्भात भाजपाचे तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार, बाजार समितीचे संचालक ज्ञानेश्वर जगताप यांनी उपविभागीय अधिकारी माणिक आहेर यांची भेट घेऊन विमा योजनेतील नुकसान भरपाईची चौकशी करण्यात यावी. या मागणीचे निवेदन दिले. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मागील खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. विमा कंपनीने केवळ कपाशी, मुग व कांदा या तीन पिकांसाठी काही प्रमाणात विमा संरक्षण देऊन शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केला. मंजुर केलेली विमा रक्कमही अतिशय अल्प आहे.

याप्रकरणी चौकशी करुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा. याशिवाय तालुक्यातील महालगाव व वांजरगाव मंडळात अतिवृष्टी झाल्याचा अहवाल असतांना शेतकऱ्यांना कमी पीकविमा मंजूर झाला आहे. काही मंडळात नुकसान होऊनही भरलेल्या रकमेइतकीसुद्धा रक्कम मंजूर झाली नाही. असा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. विमा कंपनीशी सेनेचे लागेबांधे विमा कंपनीतील वरिष्ठ अधिका-यांशी सेनेच्या नेतृत्वाने साटेलोटे केल्यामुळे मागील वर्षी कंपनीच्या विरोधात आक्रमक भुमिका घेत त्यांच्या कार्यालयावर चालून जाणारी सेना यंदा मात्र मावळ भूमिका घेत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

IMP