म्हणे लाल किल्ला आमचा; हास्यास्पद माहितीमुळे पाकिस्तान तोंडाघशी

वेब टीम : नवी दिल्ली – शांघाय सहकार्य संघटनेच्या परिषदेतील एका कार्यक्रमात प्रदर्शनाच्या माध्यमातून भारत आणि पाकिस्तानने संघटनेच्या इतर सदस्य राष्ट्रांसमोर आपला ऐतिहासिक वारसा सादर केला. दोन्हीही देशांनी मोगल सम्राट शहाजहानचा उल्लेख केला. शहाजहानची जगप्रसिद्ध स्थापत्य कला आपल्या ऐतिहासिक वारशातील भाग आहे, असे सांगण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानी प्रतिनिधी मंडळाने प्रदर्शनादरम्यान दिल्लीतील लाल किल्ल्याचे छायाचित्र दाखवले. त्यात लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगा फडकला होता. पण पाकिस्तानने लाल किल्ल्याचे हे छायाचित्र लाहोरमधील शालिमार गार्डनजवळील एका किल्ल्याचे असल्याचे सांगितले. या हास्यास्पद माहितीमुळे पाकिस्तान तोंडाघशी पडला.

पाकिस्तानने केवळ दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला आपला आहे, असे सांगितले नाही, तर मोगलांचा ऐतिहासिक वारसाही आपलाच आहे, असा दावा केला. पाकिस्तानने या प्रदर्शनावेळी लाल किल्ल्यातील संगमरवराचे महाल आणि सजावटीचाही उल्लेख केला. तर भारताने प्रदर्शनादरम्यान लाल किल्ला आणि ताज महालला स्थान दिले. ताज महालबाबत सविस्तर माहिती देताना भारताने लाल महाल हा प्रसिद्ध मकबरा असल्याचे सांगितले. मोगल सम्राट शहाजहानने बेगम मुमताज हिच्या स्मरणार्थ हा महाल बांधला. महालाचे बांधकाम १६३१ मध्ये सुरु झाले आणि १६४८ मध्ये ते बांधून पूर्ण झाले. जगातील सात आश्चर्यांपैकी ताजमहाल हा एक आहे, असे भारताकडून सांगण्यात आले. पण पाकिस्तानने लाल किल्ला आणि मोगल सम्राट शहाजहानची स्थापत्य कलेचा वारसा आपला असल्याचा दावा केल्याने शांघाय सहकार्य संघटनेच्या इतर सदस्य राष्ट्रांसमोर पाकिस्तानचे अज्ञान उघडे पडले.