लाल परी अडचणीत, ठाकरे सरकार खंबीर ; एसटीला केली तब्बल ६०० कोटींची मदत

uddhav

मुंबई : महाराष्ट्राची लाल परी अर्थात एसटी गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक संकटात सापडल्याचं पहायला मिळत आहे. याच एसटी महामंडळाला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला 600 कोटी रुपयांची आर्थिक मदत देण्याचं जाहीर केलं आहे अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिली.

कोरोना महामारीमुळे राज्यात 15 एप्रिलपासून दुसऱ्यांदा लॉकडाऊन लागू करण्यात आले. एसटीला केवळ अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी फक्त 50 टक्के आसन क्षमतेने बसेस चालू ठेवण्याचे बंधन घातले होते. त्यामुळे एसटीची वाहतूक मंदावली होती. त्याचा विपरित परिणाम एसटीच्या तिकीट महसुलावर झाला होता. गेल्या काही दिवसांमध्ये अत्यंत तुटपुंजे उत्पन्न कसेबसे एसटी महामंडळाला मिळत होते. त्यामुळे दैनंदिन खर्च भागवने देखील एसटीला शक्य नव्हते. यासाठी अनिल परब यांनी एसटी महामंडळातर्फे शासनाकडे आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव सादर केला होता.

या बाबतचे सादरीकरण आज उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांना करण्यात आले. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर दैनदिन खर्चासाठी 600 कोटी रुपये पहिल्या टप्यात देण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्य केले. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाला थोडा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी देखील परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाकडुन तब्बल1 हजार कोटी रुपये एसटी महामंडळाला मिळवुन दिले. त्यातून गेल्या सहा महिन्यांमध्ये एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देणे शक्य झाले. एसटी महामंडळाकडून आपल्या उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

IMP