fbpx

प्रकाश आंबेडकरांनी जमवलेली रेकॉर्डब्रेक गर्दी कॉंग्रेस-भाजपचे गणित बिघडवणार

टीम महाराष्ट्र देशा: वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करत असताना, आंबेडकर यांना पाठींबा देण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. आता हीच रेकॉर्डब्रेक गर्दी कॉंग्रेस – भाजपचे गणित बिघडवणार असल्याची चर्चा सध्या  सोलापूरात  सुरु आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी सोलापूरमधून लढण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर कॉंग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांना फटका बसणार असल्याचं मत राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात होते. तर भाजप उमेदवार डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांना भाजपची हक्काची मते तसेच मतदारसंघात बहुसंख्य असणारी लिंगायत मते विजयी आघाडी देतील, अशी चर्चा आहे. मात्र आंबेडकर यांनी सर्व समाजातील सामान्य नागरिकांना सोमवारी रत्यावर उतरवत आपली ताकद दाखवून दिली आहे.

वंचित बहुजन आघाडीने सुरुवातीपासून धनगर, लिंगायत, ओबीसी आणि एससी घटकाला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न चालवला आहे. सोलापूर लोकसभेचा विचार केल्याचं लिंगायत, धनगर आणि मराठा मते येथे निर्णायक ठरणार आहेत. एससी आणि ओबीसी मते विजयी आघाडी मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका निभावू शकतात. त्यामुळे या सर्व घटकांना आकर्षित करण्यात प्रकाश आंबेडकर यांना हळूहळू यश येताना दिसत आहे.

मात्र राजकारणात कोणत्याही गोष्टीची गॅरंटी देता येत नाही. त्यामुळे उमेदवारी दाखल करताना जमलेली गर्दी मतामध्ये रुपांतरीत होणार का हे पाहणं महत्वाचं आहे.