दिलासादायक: राज्यात काल नव्या रुग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्तांचा आकडा जास्त

corona breaking

मुंबई :  गेले ४ महिने कोरोनाने राज्यात हाहाकार माजवला आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, आता गेल्या काही दिवसात एक दिलासा देखील मिळत आहे. दिवसेंदिवस नव्या कोरोना रुग्णांची नोंद जरी वाढत असली तरी, कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण देखील वाढत आहे.

काल दिवसभरात तब्बल १३ हजार ४०८ (१३,४०८) रुग्ण कोरोनामुक्त झाले असल्याने कोरोनाला हरवून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा हा सलग दुसऱ्या दिवशी देखील १० हजारा पार गेला आहे. काल हे दिलासादायक आकडे जरी समोर आले असले तरी संकट मात्र कायम आहे. राज्यात काल दिवसभरात १२ हजार ७१२ (१२,७१२) नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे हा आकडा देखील वाढता असून गेल्या काही दिवसातील उच्चांक आहे.

तर, नव्या कोरोना रुग्णांच्या नोंदीपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडा जास्त असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे. दरम्यान, काल ३४४ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण बळींचा आकडा हा १८ हजार ६५० झाला असून राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा ५ लाख ४८ हजार ३१३ झाला आहे. गेल्या २४ तासांत, १३ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन गेले असून आतापर्यंत एकूण ३ लाख ८१ हजार ८४३ कोरोनाबाधित रुग्ण हे बरे झाले आहेत. वाढत्या कोरोनामुक्त रुग्णांच्या आकड्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.६४ टक्के एवढे झाले आहे. तसेच, राज्यात सद्या एकूण १ लाख ४७ हजार ५१३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.  हे वृत्त आरोग्य विभागाच्या अधिरकृत आकड्यांवर आधारित आहे.