fbpx

वाचा कॉंग्रेसचे माजी आमदार मदन भोसले यांनी का केला भाजपमध्ये प्रवेश ?

सातारा : गेल्या वर्षभरापासून केवळ चर्चेत अडकलेला वाईचे माजी आमदार मदन भोसले यांचा भाजप प्रवेशाला मुहूर्त मिळाला. एका कार्यक्रमात आज मदन भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

दरम्यान मदन भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. अगोदरच काँग्रेसची अवस्था जिल्ह्यात वाईट असताना मदन भोसले भाजपमध्ये गेल्यामुळे काँग्रेसची अवस्था आणखी बिकट झाली आहे.

कोण आहेत मदन भोसले?

मदन भोसले हे कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रतापराव भोसले यांचे पुत्र आहेत. किसन वीर उद्योग समूहाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी सातारा जिल्हा कॉंग्रेसची धुरा सांभाळली होती. ते 2004 मध्ये वाई मतदारसंघातून राष्ट्रवादीचे मकरंद पाटील यांच्याविरोधात अपक्ष निवडुन आले होते.

2014 ला पराभव

2014 ला झालेल्या निवडणुकीमध्ये मदन भोसले राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभव सहान करावा लागला होता. राष्ट्रवादीचे मकरंद जाधव-पाटील यांनी मदन भोसले यांचा जवळपास 40 हजार मतांनी मोठा पराभव केला होता.

काँग्रेसवर होते नाराज
लोणंद येथील काँग्रेसच्या मेळाव्यास मदन भोसले यांना डावलल्याबद्दलही सर्वांनी नाराजी व्यक्त केली होती. काँग्रेसचा तालुक्याचा मेळावा असताना मदन भोसले यांना बोलावले नाही, असा नाराजीचा सूर यावेळी उमटला होता. वाद वाढल्यानंतर आमदार जयकुमार गोरे आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्वत: या चुकीबद्दल माफी मागितली होती.

सहकारमंत्र्यांनी दिलेला मदतीचा हात

काँग्रेस निष्ठावंत माजी आमदार मदन भोसले यांच्या अडचणीत असलेल्या किसनवीर साखर उद्योगाला भाजप सरकारने मदत करून बाहेर काढला आहे. कारखान्यावर आलेली जप्तीची कारवाईला सहकारमंत्र्यांनी स्थगिती दिली आहे. त्याची परतफेड म्हणून भाजप नेत्यांनी मदनदादा यांना भाजपात येण्याची ऑफर दिली होती अशी चर्चा आहे.