विधान परिषद पोटनिवडणुकीत नारायण राणेंसह भाजपची प्रतिष्ठा पणाला लागणार ?

narayan rane and cm devendra fadanvis

विरेश आंधळकर: माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कॉंग्रेसला सोडचिट्ठी देताना आपला विधान परिषदेचा राजीनामा देखील दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर ७ डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. दरम्यान नारायण राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करत एनडीएमध्ये जाण्याची घोषणा केली आहे. सत्ताधारी भाजपही मित्रपक्ष शिवसेनेला शह देण्यासाठी त्यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी उतावळी झाली आहे. मात्र राणे यांना मंत्रीपद मिळाल तरी त्यांना पुन्हा एकदा विधान परिषदेवर निवडून येण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार आहे. कारण राष्ट्रवादी कॉंग्रेस या निवडणुकीत काय भूमिका घेणार हे महत्वाच ठरणार आहे. मात्र सध्याची परिस्थिती आणि राष्ट्रवादीवर होणारी टीका पाहता ते राणे आणि भाजपला साथ देण्याची शक्यता कमी आहे.

भाजपचे 122, शिवसेनेचे 63 , काँग्रेसचे 42, राष्ट्रवादी 41 तर इतर पक्षाचे 20 आमदार आहेत. भाजप आणि इतर पक्ष एकत्र आले तरी जिंकण्यासाठी लागणारा 145 चा आकडा गाठता येन शक्य नाही. तर सध्या टेक्नीकली कॉंग्रेसमध्ये असणारे नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर यांची मतं काँग्रेसच्या गोटात जाणार नाहीत. मात्र काँग्रेसचे 42, राष्ट्रवादी 41, शिवसेनेचे 63 असा १४६ चा आकडा गाठणे विरोधकांना सोप जाणार आहे. राष्ट्रपती निवडणूकीच्या वेळी भाजपला महाराष्ट्र विधानसभेतल्याच काही अदृश्य हातांनी मदत केली होती. तेच अदृश्य हात आताही राणेंच्या मदतीला धावले तर चित्र वेगळ असणार आहे. त्यामुळे एकंदरीतच विधान परिषद पोट निवडणुकीत नारायण राणेंसह भाजपची प्रतिष्ठा पणाला लागणार.