मुंबई : गत दोन वर्षांपासून कोरोनामुळे(Corona) जनजीवन विस्कळीत झाले होते ते पूर्वपदावर येत असतानाच आता कोरोनाच्या नव्या विषाणुने संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या ‘ओमिक्रॉन’(Omicron) हा विषाणू जास्त वेगाने फैलावणारा असल्याने अनेक देशांनी धास्ती घेतली आहे. त्याअनुषंगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी(२८नोव्हें.)परदेशी प्रवाशांच्या चाचण्या, जनुकीय क्रमनिर्धारण आणि त्यांचा प्रवास इतिहास नोंदवण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मुंबईत १२ नोव्हेंबरपासून ४६६ प्रवासी आफ्रिकेतील देशांमधून आले असून यातील १०० प्रवासी मुंबईतील आहेत, तर ३६६ प्रवासी मुंबईबाहेरील आहेत. मुंबईत असलेल्या १०० प्रवाशांपैकी एकालाही कोरोनाची बाधा झालेली नव्हती. त्यांचा विलगीकरणाचा काळही पूर्ण झालेला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देत पालिकेचे सहायक आयुक्त सुरेश काकाणी म्हणाले की,’या प्रवाशांना विलगीकरणाच्या कालावधीत कोरोनाची बाधा झालेली असल्यास लक्षणे दिसून येण्याची शक्यता आहे. दक्षता म्हणून यांच्या पुन्हा चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील काहींच्या चाचण्या सोमवारी केल्या आहेत. आणखी काही प्रवाशांची यादी मंगळवारी मिळणार असून या प्रवाशांच्याही चाचण्या केल्या जातील.’
दरम्यान, ठाणे महापालिका क्षेत्रात सात जण दक्षिण आफ्रिकेतून प्रवास करून आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने या सात जणांचा शोध घेऊन त्यापैकी पाच जणांच्या घशातील स्रावाचे नमुने घेतले आहेत. त्याचा अहवाल दोन दिवसांत येण्याची शक्यता आहे. या सात जणांपैकी दोन जणांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झाला होता, तर उर्वरित पाच जणांच्या विलगीकरणाचा कालावधी पूर्ण झालेला नाही, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या:
- महापौर किशोरी पेडणेकरांनी मध्यरात्री अचानक मुंबई विमानतळाला भेट देत केली पाहणी
- ‘कृषी कायद्यांबाबत चर्चा करायला सरकार घाबरतंय’
- देवोलिना भट्टाचार्जीवर भडकला सलमान खान, म्हणाला….
- ग्रामपंचायत, पंचायत समिती निवडणुकांसदर्भात मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय
- पालकमंत्री सुभाष देसाईंचा निधी वाटपात अन्याय; काँग्रेस पदाधिकाऱ्यांची बाळासाहेब थोरातांकडे तक्रार!