‘जुने उपाशी, नवे तुपाशी’ हे शासनाचे धोरण अन्यायकारक : आर.बी.एस.केचे कंत्राटी डॉक्टर आंदोलनाच्या पवित्र्यात

टीम महाराष्ट्र देशा : कंत्राटी डॉक्टरांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तर शासन सुरवाती पासून सेवेत असणाऱ्या डॉक्टर्स आणि कर्मचार्यांना डावलून नवीन शिकाऊ डॉक्टर्संना दुप्पट वेतन देऊन रुजू केले जात आहे, असा आरोप आर.बी.एस.के डॉक्टर्स व कर्मचारी संघटना (ड्रीम्स)च्या अध्यक्षा डॉ.प्रणाली वेताळ यांनी केला आहे. आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर झालेल्या बैठकीत डॉ.प्रणाली वेताळ यांनी हा आरोप केला आहे.

यावेळी त्या म्हणाल्या की, राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील प्राथमिक शाळा आणि अंगणवाडी मधील 0 ते 18 या वयोगटातील लाखो बालकांची आरोग्य तपासणी करून त्यांना पुढील सेवे साठी संदर्भित करून वैद्यकीय उपचार व शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या राज्यातील डॉक्टरांवर मात्र शासन अन्याय करत आहे.

सदर कार्यक्रमात कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी कंत्राटी स्वरुपात व अतिशय कमी मानधनात काम करत आहेत, सदर कर्मचार्यांची मानधन वाढ व कायम स्वरुपात शासन सेवेत समावेशान या ई मागण्या शासनाकडे प्रलंबित असतानाच शासनाने या व अशा अन्य पदासाठी भरती काढून त्या नवीन कर्मचाऱ्यांना जुन्याच्या दुप्पट वेतन जाहीर करून सदर वर्षानुवर्ष काम करणाऱ्या जुन्या कर्मचार्यांच्या जखमे वर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे, असे त्या म्हणाल्या मानधना बाबत होत असलेल्या या अन्याय बाबत ड्रीम्स या डॉक्टर संघटनेची व आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत मंत्री एकनाथ शिंदे यांनी तुमच्या मागण्याचा सकारात्मक विचार करून हे प्रकरण केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसोबत चर्चेला घेऊ असे आश्वासन दिले आहे.

दरम्यान या बैठकीस (सार्वजनिक आरोग्य विभाग,आयुक्त कार्यालय, राज्य कुटुंब कल्याण कार्यालय, या सर्व विभागांचे ) व्यास सर, अनुपकुमार यादव, तुकाराम मुंढे, अर्चना पाटील, दीप्ती पाटील, ड्रीम्स च्या अध्यक्षा डॉ. प्रणाली वेताळ, डॉ. गुणेश बागडे, डॉ पद्मविर थोरात व ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळचे इतर डॉक्टर आदी मान्यवर उपस्थित होते.