आगामी निवडणुकीत शिवसेनाही साथ देईल : दानवे

मुंबई – आगामी निवडणूक शिवसेनेला सोबत घेऊन लढावी, असा आमचा प्रयत्न आहे. शिवसेनाही साथ देईल अशी आशा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली आहे. भाजपा प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या वेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. प्रचाराचा मुद्दाच नसल्याने विरोधकांकडून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचा घणाघाती आरोप दानवे यांनी केला.
या वेळी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट, प्रदेश कोषाध्यक्ष शायना एन. सी., प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, प्रवक्ते केशव उपाध्ये, गणेश हाके व अवधूत वाघ उपस्थित होते.

रावसाहेब दानवे यांच्या पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे

  • देशात आणि महाराष्ट्रात गेल्या चार वर्षांमध्ये भारतीय जनता पार्टीला सातत्याने निवडणुकांमध्ये यश मिळाले आहे.
  • भाजपाने राज्यातील जवळजवळ सर्व बूथमध्ये मजबूत संघटनात्मक बांधणी केली आहे. ‘वन बूथ, ट्वेंटी फाईव्ह यूथ’ ही योजना अंमलात आणली आहे. निवडणूक यादीतील एकेका पानाची जबाबदारी कार्यकर्त्यांना दिली आहे.
  • भाजपा आगामी निवडणूक संघटनात्मक बळावर जिंकेल.
  • राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीवरून काँग्रेस पक्ष केंद्र सरकारवर करत असलेल्या आरोपांमध्ये बिलकूल तथ्य नाही.
  • राफेल या प्रकरणात कसलीही देवाणघेवाण झाली नसून काँग्रेसच्या आरोपांमध्ये कसलेही तथ्य नाही. या विषयी काँग्रेस पक्ष दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.