आपल्याला पाठिंबा दिलेल्या बाहेरील नेत्यांना सांभाळा ; दानवेंचा भाजप नेत्यांना सल्ला

टीम महाराष्ट्र देशा : अहमदनगर महानगर पालिकेची निवडणूक राज्यभर गाजली. तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने महापालिकेत महापौर बसवुन सेनेला सत्तेपासून बाजूला ठेवले आहे. अशात अल्पमतात असलेली सत्ता कशी राबवावी याचा सल्ला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिला आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष खा. दानवे नगरला आले होते. यावेळी त्यांनी मनपा कार्यालयास भेट दिली. तेव्हा त्यांनी स्थानिक भाजप नेत्यांना हा सल्ला दिला आहे.

नगरची निवडणूक राज्यात गाजली. स्वबळावर लढलो, वातावरण चांगले होते, मात्र अपेक्षित तेवढे यश मिळाले नाही. अजून थोडया जागा भाजपला मिळायल्या पाहिजे होत्या. मात्र आहे त्या परिस्थितीत इतरांची मदत घेऊन भाजपाने सत्ता मिळवली आहे. अल्पमतात असलो तरी बहाद्दुरी करून दाखवा. शांततेने संयमाने पक्षातील व पाठिंबा देणारे बाहेरील नगरसेवक, नेते मंडळींना सांभाळा. सर्वाच्या सल्ल्याने कामे करून हा कारभार चोख करावा. आता लगेचच लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे मनपाच्या चांगल्या कामांचा परिणाम लोकसभेच्या निवडणुकीवर होणार आहे. आम्ही निधी कबूल केला आहे. यासाठी मी स्वत: तुमच्याबरोबर मुख्यमंत्र्यांकडे येणार आहे. अस दानवे म्हणाले आहेत.

Loading...