एमआयएम-भारिप युतीला शुभेच्छा : दानवे

danave

टीम महाराष्ट्र देशा- केंद्र व राज्य सरकारविरोधात होत असलेल्या महाआघाडीचा कुठलाही परिणाम आमच्यावर होणार नाही. पक्षाचे संघटन मजबूत आहे. या जोरावरच आम्ही निवडणुका लढतो आणि जिंकतो. एमआयएम व प्रकाश आंबेडकर यांच्या युतीबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे लक्ष वेधले असता, त्यांच्या युतीला आमच्या शुभेच्छाच आहेत, असे त्यांनी सांगितले. या युतीचा भाजपला फायदा होईल का? या प्रश्नावर मात्र त्यांनी स्मित हास्य करून बोलणे टाळले.

नगर येथे भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, खा. दिलीप गांधी, आ. सुजितसिंह ठाकूर, आ. शिवाजीराव कर्डिले, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. मोनिका राजळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, अभय आगरकर आदी उपस्थित होते.

मागील निवडणुकीत बरोबर असलेल्या घटक पक्षांना व समविचारी पक्षांना पुढील निवडणुकीत बरोबर घेऊनच निवडणुका लढण्याची आमची भूमिका आहे. बरोबर येण्यासाठी आमचे सर्वांनाच आमंत्रण आहे. शिवसेनेबाबत आमचा चांगला अनुभव असून, मंत्रिमंडळात सर्व निर्णय एकमतानेच घेतो. त्यांच्या मनात आमच्याविषयी द्वेष आहे, असे आम्हाला वाटत नाही. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर योग्यवेळी शिवसेनेसह सर्व घटक पक्षांशी चर्चा होईल. याउपरही कोणाची स्वतंत्र भूमिका असेल, तर आमचीही स्वबळाची तयारी आहे, असे देखील दानवे यांनी स्पष्ट केले आहे.