fbpx

शेतक-यांच्या हितासाठी मंत्र्याचा मुडदा पाडायलासुद्धा मागे-पुढे पाहणार नाही – रविकांत तुपकर

टीम महाराष्ट्र देशा : ‘अच्छे दिन’च्या भूलथापा देऊन भाजपने सत्ता लाटली. त्यांची धोरणे शेतकरीविरोधी आहेत. कापूस, सोयाबीनचे भाव पाडण्याचे काम शासन करीत आहे. त्यामुळे शेतक-यांनी त्यांच्या एकाही मंत्र्याला फिरू देऊ नये, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी केले. तर शेतक-यांच्या हितासाठी एखाद्या मंत्र्याचा मुडदा पाडायलासुद्धा आपण मागे-पुढे पाहणार नाही. आता शेतक-यांनी पेटून उठण्याची गरज आहे, असे मत तुपकर यांनी मांडले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने निंबा येथे आयोजित शेतकरी मेळाव्यामध्ये ते बोलत होते.

यावेळी खासदार राजू शेट्टी म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ऊस, दुधाची भाववाढ असे आंदोलन करून शेतक-यांना न्याय मिळवून दिला. आता विदर्भात कापूस, सोयाबीनचे दर घसरले. कापूस, सोयाबीनला भाव मिळत नाही. शेतक-यांच्या आत्महत्या वाढत आहेत; परंतु शासनाला त्याचे काही देणे-घेणे नाही, असे सांगत खासदार राजू शेट्टी यांनी शासनाला असा अल्टिमेटम दिला. कापूस, सोयाबीनला भाव मिळाला नाही, तर १९ ऑक्टोबरनंतर विदर्भात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल. विदर्भातील शेतक-यांनी आंदोलनामध्ये सहभागी होऊन एकही चाक फिरू देऊ नये, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी केले.