‘तुम्ही आम्हाला घोडे लावले घोडे… आम्ही तुम्हाला बैल लावू बैल ते ही नांगरासगट…’

ravikant tupkar

बुलढाणा : बैलगाडा शर्यत ही महाराष्ट्राची परंपरा आहे. सरकार आणि न्यायालयाने या गोष्टींचा विचार करावा. बैलगाडा शर्यतीसाठी शेतकरी आक्रमक झाले आहेत. दक्षिण भारतात वेगळा न्याय आणि महाराष्ट्राबाबत का दुजाभाव असा या शेतकऱ्यांचा तसेच बैलगाडामालकांचा सवाल आहे. या शर्यतीला परवानगीसाठी शेतकरी आता थेट रस्त्यावर उतरले.

महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करावी अशी मागणी घेऊन आज बुलडाणा जिल्ह्यातील बैलगाडा चालक मालकांसोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बैल व गाडीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर लक्षवेधी मोर्चा काढण्यात आला होता.

जिल्हाभरातील शेतकरी आपल्या बैलांना सजवून त्यांच्यासह या मोर्चात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. ‘तुम्ही आम्हाला घोडे लावले घोडे….आम्ही तुम्हाला बैल लावू बैल ते ही नांगरासगट..’, ‘पेटा हटवा, बैल वाचवा’, ‘;शेतकरी एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. बुलडाणेकरांसाठी हा मोर्चा लक्षवेधी ठरला. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर, शरदनाना हाडे व राणा चंदन यांनी या मोर्चास संबोधित केले.

शर्यतीवरील बंदी उठवली नाही तर हजारो बैलगाड्या व शर्यतीचे बैल घेऊन आम्ही मुंबईच्या मंत्रालयात घुसणार. राज्यसरकाने गंभीरपणे आणि विचारपूर्वक बैलगाडा शर्यत चालू करण्याबाबत निर्णय घ्यावा अन्यथा कायदा मोडून आणि बंदी जुगारून महाराष्ट्राच्या जिल्ह्या-जिल्ह्यात शंकरफट भरवण्याचा इशारा या मोर्चा दरम्यान देण्यात आला.

महत्वाच्या बातम्या