पुढच्या आयपीएल हंगामात रविचंद्रन अश्विन खेळणार ‘या’ संघाकडून

टीम महाराष्ट्र देशा:- आयपीएलच्या पुढच्या सत्रात रविचंद्रन अश्विन हा दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे . रविचंद्रन अश्विन हा दोन वर्षापासून किंग्स इलेव्हन पंजाब संघाच्या कर्णधारपदी होता. मात्र आत्ता त्याला किंग्स इलेव्हन पंजाबने मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. अश्विनच्या नेतृत्वात किंग्स इलेव्हन पंजाब संघ हा २०१८ मध्ये सातव्या आणि २०१९ मध्ये सहाव्या स्थानावर राहिली होती. त्यामुळे किंग्स इलेव्हन पंजाबने रविचंद्रन अश्विनला डच्चू दिला आहे.

पंजाबच्या संघानं अश्विनला 7.6 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले होते. त्याने यावर्षी आयपीएलमध्ये पंजाबकडून १४ सामन्यात १५ विकेट घेतल्या होत्या. अश्विनने आयपीएलमध्ये आतापर्यंत १३९ सामन्यात १२५ विकेट घेतल्या आहेत.

दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनला मुक्त करण्यासाठी बीसीसीआयने मंजुरी दिली असून त्याची लवकरच घोषणा केली जाईल. दिल्ली कॅपिटल्सने अश्विला संघात घेण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे. पंजाब टीमला एक युवा फिरकीपटूची आवश्यकता आहे.

याचसोबत किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी लोकेश राहुल याच्यावर सोपवण्यात येऊ शकते असेही बोलले जात आहे. पंजाबचा संघ अश्विनला संघाबाहेर करत असेल तर आम्ही त्याल संघात घेण्यास तयार आहोत. आमच्यासाठी ती आनंदाची बाब असेल, असे दिल्ली संघाचा मेंटॉर सौरव गांगुलीने सांगितले.