दिल्ली पोलिसांना धक्का, टूलकिट प्रकरणातील दिशा रवीला जामीन

दिशा रवी

दिल्ली : कथित टूलकिट प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या दिशा रवी या पर्यावरणवादी कार्यकर्तीला दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांनी दिशा रवीला एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.

दिल्ली पोलिसांनी मागील पंधरवड्यात दिशा रवीला अटक केली होती. दिल्लीच्या शेतकरी आंदोलनावर ग्रेट थनबर्ग हिने प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी कथित टूलकिट प्रकरणात दिशा रवी, निकिता जॅकोब आणि शंतनू मुळूक यांच्या विरोधात गुन्हे नोंद केले होते. पोलिसांनी या प्रकरणात दिशा रवीला अटक केली होती. दिल्लीच्या न्यायालयाने दिशा रवीला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर येथील पतियाळा हाऊस न्यायालयात दिशा रवीच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली होती.

सुनावणी दरम्यान न्यायालयाने विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिल्ली पोलिसांना देता आली नव्हती. तसेच कथित खलिस्तानवाद्यांशी दिशा रवीचा थेट संबंध काय येतो हे देखील सिद्ध करता आले नव्हते. या पार्श्वभूमीवर दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयाने दिशा रवीला मंगळवारी जामीन मंजूर केला आहे. याच न्यायालयासमोर उद्या (दि. २४ ) शंतनू मुळूक च्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

काय आहे प्रकरण?

टूलकिट हे राजधानी दिल्लीत प्रजासत्ताकदिनी झालेल्या हिंसाचारासाठीची पूर्वतयारी होती. या आरोपावरून दिल्ली पोलीसांनी २२ वर्षीय दिशा रवीला बंगळुरूमधून १४ फेब्रुवारीला अटक करून तिच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात दिशा रवीला शुक्रवारी दिलेली तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सोमवारी संपणार होती. म्हणून तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

यावेळी आणखी एक दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात शनिवारी न्यायालयाने दिशा रवीच्या जामीन अर्जावर सुनावणी केली. यासंदर्भातील निर्णय राखून ठेवला असून मंगळवारी न्यायालय त्यावर निर्णय देणार आहे. दिशा रवीने टेलिग्राम अॅपच्या माध्यमातून ग्रेटा थनबर्गला टूलकिट पाठवलं व ते ग्रेटाने शेअर करावे, यासाठी प्रयत्न केले असा दिल्ली पोलिसांचा दावा आहे.

महत्त्वाच्या बातम्या