‘राऊतजी, खोटे दावे लक्षात राहत नसतील तर लिहून ठेवा! मग धक्के बसणार नाहीत’, भाजपाचा खोचक सल्ला

sanjay raut

मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी मृत्यू झाले नसल्याची आश्चर्यजनक माहिती आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत दिली आहे. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश हे कोरोनाच्या काळातील मार्गदर्शक सुचनाप्रमाणे मृत्युची आकडेवारी केंद्र सरकारला सादर करतात. या आकडेवारीनुसार ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेले नाहीत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी राज्यसभेत दिली आहे.

आरोग्य हा राज्याचा विषय असल्याचेही आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत दिलेल्या माहितीत म्हटले आहे. केंद्र सरकारने ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेले नसल्याचा दावा केल्यानंतर विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून तिखट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. सरकारच्या या उत्तरावर शिवसेना नेते संजय राऊत प्रचंड संतापले आहेत. केंद्र सरकार सत्यापासून दूर पळत आहे. हे सरकार भ्रमिष्ट झालं असून ऑक्सिजन अभावी दगावलेल्यांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारवर खटलाच दाखल केला पाहिजे, असं आवाहन संजय राऊत यांनी केलं आहे.

ऑक्सिजनअभावी एकही रुग्ण दगावला नसल्याची केंद्राची माहिती ऐकून आपल्याला धक्का बसल्याचं संजय राऊत यांनी म्हटल्यानंतर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी त्यावर टीका करत संजय राऊतांना खोचक सल्ला दिला आहे. ‘खोटे दावे लक्षात राहत नसतील तर लिहून ठेवा! मग धक्के बसणार नाहीत’ असे ते म्हणालेत.

‘मे महिन्यात ठाकरे सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितले होते की राज्यात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही. केंद्राचे अहवाल राज्याने दिलेल्या माहितीच्या आधारेच बनतात. केंद्राने ठाकरे सरकारच्या माहितीच्या आधारे तसाच अहवाल बनवला. या अहवालाने म्हणे संजय राऊत यांना धक्का बसला.

अहो राऊतजी, निर्लज्जपणालाही मर्यादा असतात. ठाकरे सरकारने न्यायालयात केलेले खोटे दावे लक्षात राहत नसतील तर लिहून ठेवत जा. मग असे धक्के बसणार नाही. राऊत आता लोकांना केंद्र सरकारविरुद्ध केस दाखल करायला सांगतायत. मग आता तोच न्याय स्वतःलाही लावा.’ असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP