शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या रत्नाकर गुट्टेच्या काळ्या कामाचा लेखाचिठ्ठा वाचा

परभणी – बनावट कागदपत्रांच्या मदतीने शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज घेतल्याप्रकरणी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि उद्योगपती रत्नाकर गुटे यांच्या विरोधात परभणी जिल्ह्यातील गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बुधवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल केला गेला. मराठवाड्यातील १५ हजार शेतकऱ्यांच्या नावावर रत्नाकर गुट्टे यांनी तब्बल ३२८ कोटी रुपयांचं कर्ज उचललं होतं. विशेष म्हणजे याबद्दल संबंधित शेतकऱ्यांना कल्पनादेखील नव्हती.

रत्नाकर गुट्टे यांनी आंध्र बँक, युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक आणि रत्नाकर बँक या सहा बँकांच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या मदतीनं शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज उचललं होतं.

गुट्टेंच्या मालकीच्या गंगापूर शुगर अँड एनर्जी लिमिटेड या खासगी साखर कारखान्यानं शेतकऱ्यांच्या नावानं हे बोगस कर्ज उचललं आहे. सहा राष्ट्रीयकृत आणि एका खाजगी बँकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा सारा व्यवहार झाल्याचं उघडं झालं आहे.

रत्नाकर गुट्टे हे परळी तालुक्यातील दैठणाघाट येथील रहिवाशी आहेत. त्यांच्या पत्नी सुधामती गुट्टे राष्ट्रवादीच्या महिला सरचिटणीस होत्या. एकेकाळी अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे गुट्टे यांचे आता पंकजा मुंडे यांच्याशी चांगले संबंध आहेत. रत्नाकर गुट्टे यांनी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाकडून मागील विधानसभा निवडणूक लढवली होती.

गंगाखेड साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या नावाने काढलेले कर्ज

 • आंध्र बँक – ३९ कोटी १७ लाख
 • युको बँक – १४ कोटी 78 लाख
 • युनाटेड बँक ऑफ इंडिया – ७६ कोटी ३२ लाख
 • बँक ऑफ इंडिया – ७७ कोटी ५९ लाख
 • सिंडिकेट बँक – ४७ कोटी २७ लाख
 • रत्नाकर बँक – ४० कोटी २० लाख
 • एकूण – ३२८ कोटी .

घोटाळा आणि रत्नाकर गुट्टे यांचा जुना संबंध

दरम्यान , 2015 जलयुक्त शिवार योजनेंतर्गत परभणी जिल्ह्यातील कामांसाठी निविदा मागविल्या होत्या. यात गंगाखेड व पालम तालुक्यातील कामांचा समावेश होता .  पालममधील तीन गावात असलेल्या ९ योजनांच्या कामाची किंमत ९५ लाख ७४ हजार ९३८, तर गंगाखेडच्या तीन गावांमध्ये असलेल्या ७ योजनांच्या कामांची किंमत ६९ लाख ३९ हजार ३१७ रुपयेे होती. दोन तालुक्यातील या सर्व कामांचा आकडा दीड कोटीच्या पुढे जाणारा होता. या संदर्भातील निविदा प्रक्रियेत रत्नाकर गुट्टे यांच्या सुनील हायटेकने जी निविदा सादर केली, त्यातील संपूर्ण कागदपत्रांवर डिजिटल सही असणे आवश्यक होते. मात्र, ही सही नसल्याने निविदा अपात्र ठरविण्यात आली. या संदर्भात कार्यकारी अभियंत्यांनी अधीक्षक अभियंता लघुसिंचन (जलसंधारण मंडळ, औरंगाबाद) यांना ९ एप्रिल २०१५ रोजी एका पत्राद्वारे सुनील हायटेक कंपनीच्या निविदेच्या प्रत्येक पानावर डिजिटल सही उमटली नसल्याने निविदेतील अटी व शर्तीनुसार ते अपात्र ठरले, असे कळविले. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सेलमोहा, गुंजेगाव येथील कामांच्या निविदा दाखल करणाऱ्या एस. एस. राठोड, विजय कन्स्ट्रक्शन, चौंडेश्वर कन्स्ट्रक्शन यांना मात्र पात्र ठरविले होते. सुनील हायटेकची निविदा अपात्र ठरविल्यानंतर अधीक्षक अभियंत्यांनी ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या खासगी सचिवांना १० एप्रिलला पाठविलेल्या पत्रात संबंधित विभागाच्या मंत्र्यांच्या खासगी सचिवाच्या दूरध्वनी संदेशाचा उल्लेख आहे. त्यानंतर मात्र अपात्र ठरविलेल्या सुनील हायटेकच्या निविदेला ग्राह्य धरण्याचा प्रकार घडला होता .  त्यानंतर सुनील हायटेक कंपनीला जलयुक्त शिवारची कामे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. १५ मे रोजी सुनील हायटेक कंपनी यांना कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात होते .

कोट्यवधींचा घोळ घालणारा रत्नाकर गुट्टे कोण आहे ?

 1. बीडच्या परळी तालुक्यातील दैठणघाटचे रहिवासी आहेत.
 2. परळीच्या थर्मल प्लांटवर मजूर कंत्राटदार असा प्रवास
 3. सुनील हायटेक प्रा.लि. च्या माध्यमातून देशभरातील वीज प्रकल्पांची कामे मिळवली
 4. शरद पवार यांच्या हस्ते गंगाखेड साखर कारखान्याचा शुभारंभ
 5. सध्या पंकजा मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख
 6. २०१४ मध्ये रा.स.प. च्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढवली .