राष्ट्रवादी परिवर्तन यात्रेद्वारे सरकारचे अपयश जनतेसमोर मांडणार

टीम महाराष्ट्र देशा- देशात भाजपा सरकार येऊन साडेचार वर्षांचा काळ झाला आहे. सत्तेवर येताना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता भाजप सरकारने केली नाहीच उलट सर्वच स्तरांवर सरकार अपयशी ठरले आहे. लोकांच्या मनात आता परिवर्तन झालं पाहिजे, ही भावना आहे. ही लोकभावना ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे परिवर्तन यात्रेचे आयोजन येत्या १० जानेवारीपासून करण्यात येणार आहे.

रायगड येथून छत्रपती शिवाजी महाराज यांचा आशिर्वाद घेऊन, चवदार तळ्याच्या सत्याग्रहस्थळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा सोबत घेऊन यात्रेस सुरूवात होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी मुंबईत पत्रकार परिषदेदरम्यान दिली.

यात्रेची सुरूवात कोकण पट्ट्यातून होणार असून पहिली परिवर्तन सभा महाड येथे पार पडेल. यानंतर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र अशा टप्प्यांमध्ये यात्रेचा प्रवास होईल. संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसमोर जाऊन सरकारचे अपयश पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, वरिष्ठ नेते छगन भुजबळ. विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी मांडणार आहेत.

या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ प्रवक्ते क्लाईड क्रास्टो,संजय तटकरे, महेश चव्हाण उपस्थित होते.