राष्ट्रहिताची कामे केवळ भाषणे करून होत नाहीत :अण्णा हजारे

अहमदनगर : बलशाली भारतासाठी ग्रामविकासाला गती देणे व विकास कामांना लागलेली भ्रष्टाचाराची गळती थांबविणे समाज व राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पण अशी कामे फक्त भाषणांनी होणार नाहीत. त्यासाठी उक्तीला कृतीची जोड देणारे, कथनी व करणीला जोड देणारे नेतृत्व हवे, अशा शब्दात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बुधवारी प्रसिद्धी पत्रकातून टोला लगावला आहे.

दरम्यान,यापूर्वीच हजारे यांनी उपोषणाची घोषणा केली आहे. लोकपाल, लोकायुक्त तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसदर्भात नवी दिल्लीत करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करून 9 महिने उलटूनही एकाही अश्वासनाची पूर्तता न झाल्याने येत्या 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धीत उपोषण सुरू करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात दिला आहे.